आयोवा ‘कॉकस’चा निकाल
अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठीचे रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर त्यांचे पक्षांतर्गत प्रतिस्पर्धी टेड क्रूझ यांनी आयोवा राज्यातील प्राथमिक फेरीत (कॉकस) धक्कादायक मात करीत निवडणुकीत चुरस निर्माण केली आहे. तसेच डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांनी त्यांचे डाव्या विचारांचे पक्षांतर्गत प्रतिस्पर्धी बर्नी सँडर्स यांच्यावर निसटता विजय मिळवला.
रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून आक्रमक मोर्चेबांधणी करणारे ट्रम्प वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत आहेत. त्या तुलनेत टेक्सासचे सिनेटर क्रूझ आपली मोहीम शांततेत राबवीत आहेत. अशा परिस्थितीत आयोवातील निवडणुकीत क्रूझ यांनी तब्बल २८ टक्के मते मिळवून ट्र्म्प यांना कडवे आव्हान निर्माण केले आहे.ट्रम्प यांना २४ टक्के मते मिळाली. तर तिसरे रिपब्लिकन उमेदवार मार्को रुबिओ यांनीही २३ टक्के मते मिळवत आपले आव्हान जिवंत ठेवले आहे.
दुसरीकडे डेमोक्रॅटिक पक्षात हिलरी यांना ५० टक्के, तर सँडर्स यांनी ४९ टक्केमते मिळविली.
या अनपेक्षित निकालानंतर ट्रम्प यांना निराशा लपविता आली नसली, तरी अध्यक्षपदासाठी आपणच रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार असू, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
क्रूझ यांनी या निकालाने पुढील रिपब्लिकन उमेदवार अथवा अध्यक्ष प्रसारमाध्यमे वा लॉबिस्ट नव्हे, तर अमेरिकन जनता निवडणार आहे, असा टोला लगावला.

कॉकस म्हणजे काय?
संबंधित राज्यांतील मतदार ज्या बैठकांच्या माध्यमातून उमेदवार निवडतात त्या बैठका म्हणजे ‘कॉकस’. त्याच्याच समकक्ष ‘प्रायमरी’ सरकारी यंत्रणा राबविते. या दोन्हींतून लोकपसंत ठरलेले प्रतिनिधी आपल्या पक्षाचा अध्यक्षपदाचा उमेदवार ठरवितात.