देशी बनावटीचे पहिले सर्वात हलके लढाऊ विमान तेजस आजपासून खऱया अर्थाने भारतीय हवाई दलात दाखल झाले. डीआरडीओ आणि हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱया या प्रकल्पातील दोन विमानं आज सेवेत दाखल झाली. हवाई दलामध्ये समावेश होताना “स्क्वाड्रन ४५ ” अशी ‘तेजस’च्या पहिल्या ताफ्याची ओळख असेल.

‘तेजस’च्या निर्मितीमागच्या १० महत्त्वपूर्ण गोष्टी-

# १९८३ साली ऑगस्ट महिन्यात निवृत्तीकडे निघालेल्या ‘मिग-२१’ एस विमानांची जागा घेण्यासाठी स्वदेशी बनावटीचे हलके लढाऊ विमान तयार करण्याच्या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली. त्यानंतर १९८४ साली तेजस विमान बनविण्यासाठीच्या हालचाली सुरू झाल्या.

# १९८६ साली या प्रकल्पासाठी ५७५ कोटींची तरतूद करण्यात आली.

# जानेवारी २००१ मध्ये ‘तेजस’ या स्वदेशी लढाऊ विमानाने पहिल्यांदा हवेत झेप घेतली. तत्कालीन पंतप्रधान वाजपेयी यांनी या लढाऊ विमानाचे नामकरण ‘तेजस’ असे केले होते.

# ‘तेजस’ हवाई दलाच्या ताफ्यात दाखल होण्यासाठी बराच विलंब झाला. ‘मिग-२१’ विमाने ताफ्यातून निवृत्त करण्यासाठी हवाई दल अखेरच्या टप्प्यापर्यंत पोहोचले असतानाच अगदी महत्त्वाच्या क्षणी ‘तेजस’ची हवाई दलात एण्ट्री झाली आहे.

# हवेतून हवेत मारा करणारे मिसाईल, हवेतून जमिनीवर मारा करणारे मिसाईल, अॅंटी शिप मिसाईल, बॉम्ब आणि रॉकेट्स वाहून नेण्याची क्षमता ‘तेजस’मध्ये आहे.

PHOTOS: ‘तेजस’ लढाऊ विमानाच्या फिचर्सवर एक नजर..

# ४२ टक्के कार्बन फायबरचे संमिश्र, ४३ टक्के अॅल्युमिनियम धातूंचे मिश्रण आणि उर्वरित टायटॅनियम धातूंच्या मिश्रणातून ‘तेजस’ विमानाची बांधणी करण्यात आली आहे.

# तेजस लढाऊ विमानाचे दोन प्रकार उपलब्ध करून देण्यात आले आहेत. पहिल्या प्रकारात केवळ वैमानिकासाठी जागा असणारे विमान, तर दुसऱया प्रकारातील विमान हे वैमानिक आणि सहकारी असे दोन सीट असणारे आहे.

# याआधी ‘तेजस’ हे लढाऊ विमान बेहरिन आंतरराष्ट्रीय हवाई कार्यक्रम २०१६ मध्ये प्रात्यक्षिक म्हणून दाखल झाले होते. या कार्यक्रमात ‘तेजस’ची तुलना पाकिस्तानच्या ‘जेएफ-१७ थंडर’ या लढाऊ विमानाशी केली गेली होती. पाकने या विमानाची बांधणी चीनच्या सहकार्याने केली आहे.

# भारतीय हवाई दलातील सर्वात हलके लढाऊ विमान म्हणून ‘तेजस’ ओळखले जाणार आहे.

# ‘तेजस’च्या एफओसी प्रकारातील विमानाचा कमाल वेग हा तब्बल २,२०५ किमी प्रतितास इतका आहे, तर आयओसी प्रकारातील विमानाचा कमाल वेग हा २,००० किमी प्रतितास इतका आहे.