बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचं वय आता ६५ च्या पुढे आहे, त्यांनी आता राजकारणातून संन्यास घेतला पाहिजे अशी टीका राजदचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी केली आहे. नितीशकुमार यांनी ५० वर्षांपुढे वय असलेल्या आणि चांगलं काम न करणाऱ्या शिक्षकांचे राजीनामे सक्तीनं घेतले होते, आता नितीशकुमार स्वतः ६५ वर्षांच्या वरच्या वयाचे आहेत मग त्यांनी राजीनामा का देऊ नये? असा प्रश्न तेजस्वी यादव यांनी विचारला आहे.

बिहारमधल्या सरकारी शाळांमध्ये ज्या शिक्षकांचं वय ५० वर्षांच्या वर गेलं आहे आणि ज्यांना चांगलं शिकवता येत नाही अशा शिक्षकांचे राजीनामे घेण्याचा निर्णय नितीशकुमार यांनी घेतला होता आता तेजस्वी यादव यांनी हाच निकष पुढे करत नितीशकुमारांनी संन्यास घ्यावा असं म्हटलं आहे.

बिहारमध्ये शिक्षणाचा दर्जा घसरला
बिहारमध्ये शिक्षणाचा दर्जा ढासळला आहे, त्यावर नितीशकुमार काहीच का बोलत नाहीत? त्यांना विद्यार्थ्यांबाबत चिंता तरी वाटते का? अनेक हुशार विद्यार्थ्यांची परंपरा बिहारमध्ये आहे, मात्र सध्याच्या घडीला बिहारमध्ये शिक्षणाचा दर्जा घसरला आहे. परीक्षांचे निकाल उशिरा लागत आहेत. अर्धवट शिक्षण घेतलेले शिक्षक शाळेत शिकवत आहेत या परिस्थितीला कोण जबाबदार आहे हे नितीशकुमार सांगतील का? असे प्रश्न उपस्थित करत तेजस्वी यादव यांनी पुन्हा एकदा नितीशकुमारांवर निशाणा साधला आहे.

बिहारमध्ये राजद आणि जदयू यांची युती तुटल्यापासून माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव हे कायम नितीशकुमारांवर टीका करताना दिसत आहेत. इतकंच नाही तर नितीशकुमारांनाच युती तोडायची होती, महाआघाडीचं काय होणार हा प्रश्न त्यांना पडला नव्हता. शिक्षकांना शाळेतून सक्तीची निवृत्ती घ्यायला लावणाऱ्या नितीशकुमारांनी आता बिहारमधल्या घसरलेल्या शिक्षण पद्धतीची जबाबदारी घ्यावी आणि नैतिक जबाबदारी स्वीकारत राजीनामा द्यावा अशी मागणी तेजस्वी यादव यांनी केली आहे.

नितीशकुमार यांनी लालूप्रसाद यादव यांच्यावर झालेल्या भ्रष्टचाराच्या आरोपानंतर आणि सीबीआय छाप्यानंतर राजदसोबत युती तोडली आणि आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर भाजपसोबत हातमिळवणी केली आणि बिहारमध्ये जदयू आणि भाजपची सत्ता आली. यादव कुटुंबासाठी आणि काँग्रेससाठी हा धक्काच होता. त्यानंतर तेजस्वी यादव नितीशकुमारांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत असंच दिसून येतं आहे.