विधानसभेत तेजस्वी तर विधिमंडळ नेतेपदी राबडीदेवी

लालूप्रसाद यादव यांचे चिरंजीव आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची सोमवारी बिहार विधानसभेतील राष्ट्रीय जनता दल विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड करण्यात आली. ‘हे घराणेशाहीच्या राजकारणाचे खुले प्रदर्शन’ असल्याची टीका भाजपने केली आहे.
पक्षनेत्याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार राजद विधिमंडळ पक्षाने लालूप्रसाद यादव यांना दिला होता. त्यानुसार त्यांनी वैशाली जिल्ह्य़ातील राघोपूर येथून प्रथमच निवडून आलेले तेजस्वी यादव यांची या पदावर निवड केली, अशी माहिती लालूंचे निकटवर्तीय आमदार भोला यादव यांनी दिली.
लालूंच्या पत्नी राबडीदेवी या द्विसदस्यीय विधिमंडळ पक्षाच्या प्रमुख असणार आहेत. तेजस्वी यादव उपमुख्यमंत्रिपदी असून, राबडीदेवी या विधान परिषद सदस्य आहेत. तेजस्वीच्या निवडीतून, त्याला आपला वारस बनण्यासाठी मार्गदर्शन करण्याचे लालूंचे प्रयत्न स्पष्ट झाले आहेत.
तेजस्वी यांची निवड हे ‘घराणेशाहीच्या राजकारणाचे खुले प्रदर्शन’ असल्याची टीका भाजप विधिमंडळ पक्षाचे नेते प्रेमकुमार यांनी केली आहे. राजदच्या १५ वर्षांच्या कार्यकाळात लालूंना घराणेशाहीचे राजकारण करताना देशाने पाहिले असून, तेच आता सुरू झाले आहे, असे कुमार म्हणाले.