तेलंगणा प्रश्नावर केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि माजी गृहमंत्री पी. चिदम्बरम यांनी केलेल्या विधानांमुळे तेलंगणावासीयांची घोर फसवणूक झाल्याच्या आरोपाची गंभीर दखल घेत स्थानिक न्यायालयाने सोमवारी पोलिसांना या प्रकरणी तपास करण्याचे आदेश दिले आहेत. तेलंगणा कनिष्ठ वकील संघटनेचे अध्यक्ष नरेश कुमार यांनी तेलंगणा प्रश्नावर सुशीलकुमार शिंदे आणि पी. चिदम्बरम यांनी लोकांची फसवणूक केल्याचा आरोप करीत न्यायालयात धाव घेतल्यानंतर रंगारेड्डी जिल्ह्य़ातील महानगर दंडाधिकारी न्यायालयाचे न्या. यू. डी. दुर्गा प्रसाद यांनी यासंबंधी तपास करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. तसेच याबाबतचा अहवाल १४ फेब्रुवारीपर्यंत सादर करण्याचेही आदेश दिले आहेत.
तेलंगणा प्रश्नावर गेल्या वर्षी २८ डिसेंबर रोजी दिल्लीत सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची बैठक झाली होती. या बैठकीत सुशीलकुमार शिंदे यांनी महिन्याभरात तेलंगणाबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. शिंदे यांनी दिलेला महिन्याभराचा कालावधी समाप्त झाला आहे. तसेच रविवारी तेलंगणा प्रश्नावर आणखी  वेळ लागणार असल्याचे स्पष्ट केल्यामुळे तेलंगणावासीयांमध्ये संतापाची भावना पसरली आहे. त्याचप्रमाणे ९ डिसेंबर २००९ मध्ये तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री पी. चिदम्बरम यांनीही स्वतंत्र तेलंगणा राज्याबाबतचा निर्णय तातडीने घेण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर २३ डिसेंबर २००९ रोजी चिदम्बरम यांनी स्वतंत्र तेलंगणाबाबत सर्व बाजूंनी विचार करून निर्णय घेण्याकडे केंद्र सरकारचा कल असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर आजतागायत तेलंगणा प्रश्न प्रलंबित असून दोन्ही देशांनी तेलंगणावासीयांची फसवणूक केल्याचा आरोप करीत दोन्ही केंद्रीय मंत्र्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी न्यायालयाकडे केली.
दरम्यान, सायबराबादचे पोलीस आयुक्त सीएच द्वारका तिरुमलाराव यांनी सांगितले की, या प्रकरणी न्यायालयाने दिलेल्या आदेशाची प्रत अद्याप प्राप्त झालेली नाही. न्यायालयाच्या आदेशाचा अभ्यास करूनच या प्रकरणी गुन्हा नोंदवायचा की नाही, याचा निर्णय घेण्यात येईल.
तेलंगणा प्रश्नावर तेलंगणा भागात तणावाचे वातावरण असून विद्यार्थी संघटना तसेच स्वतंत्र तेलंगणाची मागणी करणाऱ्या संघटनांनी रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी मोठय़ा प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.