भारतीय संसदेच्या इतिहासात प्रथमच केंद्रीय मंत्र्यांनीच संसदीय कामकाजात घोषणाबाजी करीत व्यत्यय आणण्याची घटना घडली. आंध्र विभाजनावरून पेटलेले वादळ शांत होण्याची चिन्हे नसून या मुद्दय़ावरून विरोधकांपेक्षा सत्ताधारीच सरकारवर कृद्ध झाल्याचे पाहायला मिळाले. रेल्वेमंत्री मल्लिकार्जुन खरगे अंतरिम रेल्वे अर्थसंकल्प मांडत असताना चार केंद्रीय मंत्र्यांनी लोकसभेच्या सभागृहात हौद्यात उडी घेत घोषणाबाजी केली. त्यामुळे, अर्थसंकल्पच आटोपता घेण्याची नामुष्की खरगे यांच्यावर ओढवली. पंतप्रधानांनी सत्ताधारी पक्षाच्या मंत्र्यांच्या या वर्तनाने ‘आपण व्यथित झालो आहोत’, असे सांगितले. तर केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री पाल्लम राजू यांनी, ‘सरकारला हे विधेयक मंजूर करून घेण्याची इतकी घाई का आहे’, असा संतप्त सवाल केला.
अखंड आंध्र प्रदेश राज्याचे समर्थक आणि विरोधक यांच्यातील द्वंद्व बुधवारी पाहावयास मिळाले. सीमांध्र भागातील के.एस.राव, डी. पुरंदेश्वरी, चिरंजीवी आणि के. सूर्य प्रकाश रेड्डी या चार केंद्रीय मंत्र्यांनी हौद्यात धाव घेतली आणि घोषणाबाजी करीत अखंड आंध्र राज्याची मागणी केली. एम.पाल्लम राजू आणि कृपलानी किल्ली हे केंद्रीय मंत्री आपल्या बाकांवरूनच घोषणाबाजी करणाऱ्या मंत्र्यांचे समर्थन करताना दिसले. या मुद्दय़ावर पक्षीय मतभेद विसरून अनेक आंध्र समर्थक एकत्र आले. वायएसआर काँग्रेसचे जगनमोहन रेड्डी यांनीही अखंड आंध्रच्या समर्थनार्थ हौद्यात धाव घेतली.
आणि समरप्रसंग टळला..
काँग्रसचे तेलंगण समर्थक खासदार एम.जगन्नाथ आणि तेलगू देसम पक्षाचे खासदार एन. शिवप्रसाद यांच्यातील ‘समरप्रसंग’ जनता दलाच्या शरद यादव आणि तृणमूल काँग्रेसच्या सौगाता रॉय यांच्या समयसूचकतेमुळे टळला. शिवप्रसाद यांनी केलेल्या स्वतंत्र तेलंगण राज्याचे विधेयक टरकाविण्याच्या हावभावावर संतप्त होत जगन्नाथ यांनी त्यांच्यावर हात उचलण्यासाठी धाव घेतली होती. मात्र यादव यांनी त्यांना वेळीच अडविल्याने सभागृहातच मारामारी होण्याचा दुर्धर प्रसंग ओढवला नाही.संसदेत रणकंदन सुरू असतानाच तृणमूल काँग्रेस आणि अखिल भारतीय अण्णा द्रमुकच्या खासदारांनी आपल्या राज्यांवर अन्याय होत असल्याचे सांगत हौद्यात धाव घेतली. आणि घोषणाबाजी करीत न्याय मिळावा, अशी मागणी केली.
गदारोळाने पंतप्रधानांचे हृदय विदीर्ण
अतिशय मितभाषी राजकारणी म्हणून प्रसिद्ध असलेल्या डॉ. मनमोहन सिंग यांनी संसदेच्या सभागृहाच्या कामकाजात सातत्याने व्यत्यय आणला जाणे, हे लोकशाहीसाठी मारक असल्याचे सांगतानाच, ‘या गदारोळाने माझे हृदय विदीर्ण होते’, असे म्हटले आहे. ‘वारंवार शांततेचे आवाहन करूनही त्याला प्रतिसाद न देणाऱ्या सदस्यांचे सभागृहातील हे वर्तन अनाकलनीय आहे’, अशा शब्दांत डॉ. सिंग यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.