शिक्षक आणि वर्गातील मुलांशी मैत्री केल्याने पालकांनी १३ वर्षांच्या मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना तेलंगणामध्ये घडली आहे. ही हत्या ऑनर किलिंगचा प्रकार असू शकतो, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. मुलीने आत्महत्या केली, हे भासवण्यासाठी पालकांनी तिचा मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केल्याचीही माहिती समोर आली आहे.

नालगोंडा जिल्ह्यातील चितापल्ली गावात राहणारी आर. राधिका ही १३ वर्षांची मुलगी गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता होती. सातवीत शिकणाऱ्या राधिकाचा मृतदेह सोमवारी गावाजवळील निर्जनस्थळी सापडला होता. स्थानिकांनी अज्ञात मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडल्याची माहिती पोलिसांना दिली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. चौकशीत हा मृतदेह राधिकाचा असल्याचे समोर आले. त्यावेळी राधिकाच्या आई-वडिलांनी मुलीने आत्महत्या केली असावी, असे सांगितले. मात्र, पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर त्यांनीच मुलीची हत्या केल्याचे स्पष्ट झाले.

वडिलांनी मुलीला शाळेतील मुलांशी आणि एका पुरुष शिक्षकाशी बोलताना पाहिले होते. त्यामुळे घरी परतल्यानंतर वडिलांनी राधिकाला समज दिली होती. मात्र, तरीही ती पुन्हा शाळेतील काही मुलांशी बोलताना दिसली. याबद्दल जाब विचारला असता तिने आपल्याला यामध्ये काही गैर वाटत नसल्याचे उत्तर आई-वडिलांना दिले. हे उत्तर ऐकून राधिकाच्या पालकांना प्रचंड राग आला. याच रागाच्या भरात त्यांनी राधिकाची हत्या केली. त्यानंतर आम्ही तिचा मृतदेह निर्जनस्थळी नेऊन जाण्याचा प्रयत्न केला, अशी कबुली राधिकाच्या वडिलांनी दिली.