तेलंगणला विशेष राज्याचा दर्जा द्या, अशी मागणी शनिवारी तेलंगण विधानसभेने केली. या संदर्भातील एक ठराव विधानसभेत संमत करण्यात आला.
विशेष राज्याचा दर्जा देण्यासाठी आवश्यक असणारी पात्रता तेलंगणकडे आहे. त्यामुळे केंद्र सरकारने तेलंगण आणि आंध्र प्रदेश या राज्यांना समान पातळीवर वागणूक द्यावी, असे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव म्हणाले.
या वेळी महसूल विभाग आंध्र प्रदेशाशी विलीन करण्याच्या प्रस्तावाला विरोध करणारा ठरावही संमत करण्यात आला. केंद्राने यासंदर्भातील विधेयक मागे घेण्याची मागणी विधानसभेने केला. सात महसूल केंद्रे आंध्रातील विभागात विलीन करण्याचा प्रस्ताव घटनाविरोधी आहे. त्यामुळे पोलावरम जलसिंचन प्रकल्पावर त्यांचा परिणाम होऊ शकतो, असे मुख्यमंत्री राव यांनी स्पष्ट केले.
पोलावरम जलसिंचन प्रकल्पाच्या आराखडय़ात बदल न केल्यास तेलंगणला मोठा तोटा सहन करावा लागेल. म्हणूनच तेलंगण विधानसभेचा त्यास सविरोध राहील, असे ते म्हणाले.  याच वेळी एव्हरेस्टवीर पूर्णा आणि आनंद यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडतानाच दोघांना प्रत्येकी २५ लाखांचे बक्षीस जाहीर केले.