दहशतवादाच्या वाढत्या धोक्याचे कारण पुढे करून पाकिस्तानने दिल्ली आणि लाहोर यादरम्यानची दोस्ती बससेवा वाघा सीमेपर्यंतच सीमित ठेवण्याचा प्रथमच निर्णय घेतला आहे.
पाकिस्तानच्या या निर्णयामुळे आता दोन्ही बाजूंनी येणाऱ्या प्रवाशांना वाघा सीमेवर दुसऱ्या बसने प्रवास करावा लागणार आहे. भारताचे तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी १६ मार्च १९९९ रोजी दोन देशांमधील बससेवा सुरू केली होती.
मात्र भारत-पाकिस्तान दोस्ती बससेवा आता वाघा सीमेपर्यंतच उपलब्ध होईल, असे पाकिस्तान पर्यटन विकास महामंडळाने जाहीर केले आहे. लाहोरहून अमृतसर अथवा दिल्लीला जाणाऱ्या प्रवाशांना आता वाघा सीमेवर दुसरी बस पकडावी लागणार आहे.