करमणुकीची वेगवेगळी साधने उपलब्ध झाल्यानंतरही प्रत्येकाला नवे काहीतरी हवेच असते. काहींना त्यामध्ये थरार हवा असतो. तर काहींना सामुहिकपणे आनंद लुटायचा असतो. मग यातूनच नवनव्या कल्पना लढवल्या जातात. अशीच एक कल्पना लॉस एंजेलिसमध्ये प्रत्यक्षात आली आहे. आकाशामध्ये खूप उंचावर तुम्हाला घसरगुंडी खेळायची असेल, तर इथे यावे लागेल.
लॉस एंजेलिसमध्ये यूएस बॅंक टॉवरवर ही घसरगुंडी तयार करण्यात आलीये. विशेष म्हणजे ही घसरगुंडी काचेपासून तयार करण्यात आल्यामुळे ती पूर्णपणे पारदर्शक आहे. त्यामुळे त्यावर बसून वेगाने खाली येण्याचा आनंद घेताना तुम्हाला खालील आणि आजूबाजूचे दृश्यही दिसू शकतो. या इमारतीच्या ६९ आणि ७० व्या मजल्यांच्या दरम्यान तयार करण्यात आलेल्या घरसगुंडीची लांबी ४५ फूट इतकी आहे. या घसरगुंडीवर बसल्यावर तुम्हाला संपूर्ण शहराचा नजारा बघायला मिळतो. घसरगुंडी वापरणाऱ्या प्रत्येकाला एका विशिष्ट प्रकारची प्लॅस्टिकची बॅग दिली जाते. ज्याच्या साह्याने त्याला उंचावरून खाली येता येते. घसरगुंडीच्या एका राईडसाठी व्यक्तीला ८ डॉलर इतके शुल्क आकारले जाते.
दरम्यान, या टॉवरची कमाई घटल्यामुळे उत्पन्न वाढविण्यासाठी त्यांनी अशा पद्धतीने उंचावरील घसरगुंडी तयार करण्याची शक्कल लढविल्याचा दावा एका इंग्रजी वेबसाईटने केला आहे.