पाकिस्तानला दहशतवादामुळे १०७ अब्ज रूपयांचा फटका गेल्या दहा वर्षांंत बसला आहे. पाकिस्तानचे अर्थमंत्री इशाक दर यांनी गुरूवारी राष्ट्रीय आर्थिक आढावा सादर केला, त्यात ही माहिती देण्यात आली आहे. अहवालात म्हटले आहे की, गेल्या चौदा वर्षांत पाकिस्तानला अप्रत्यक्षपणे दहशतवादामुळे १०७ अब्ज डॉलर म्हणजे ८.७ ट्रिलियन रूपयांचा फटका बसला आहे. मात्र, लागोपाठच्या लष्करी कारवायांमुळे सुरक्षा स्थिती सुधारली आहे. या वार्षिक अहवालानुसार दहशतवादामुळे होणारे नुकसान गेल्या नऊ महिन्यात ३२ टक्के कमी झाले. गेल्या आर्थिक वर्षांत ते ६८१. ६८ अब्ज रूपये होते, ते गेल्या नऊ महिन्यात ४५७.९३ अब्ज रूपये इतके खाली आले आहे. पाकिस्तानात दहशतवादामुळे झालेले नुकसान विचारात घेताना मनुष्यहानीचाही विचार केला जातो, तसेच आर्थिक संधी व देशाच्या पायाभूत सुविधांचे नुकसान विचारात घेतले जाते. पाकिस्तानात पेशावरमधील शाळेवर झालेल्या हल्ल्यानंतर दहशतवादाविरोधात कडक धोरण स्वीकारण्यात आले आहे. त्या हल्ल्यात १३१ मुलांसह एकूण १४१ जण ठार झाले होते.