बलुचिस्तानची राजधानी क्वेट्टा येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रावर दहशतवाद्यांनी सोमवारी रात्री हल्ला चढवला. या हल्ल्यात ६० जण मृत्युमुखी पडले असून १०० पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. भारताचे केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी या हल्ल्याविषयी शोक व्यक्त करताना आपला कोणत्याही प्रकारच्या हिंसाचाराला पाठिंबा नसल्याचे म्हटले आहे. गेल्या काही दिवसांत उरी दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये शिरून केलेला सर्जिकल स्ट्राईक यामुळे दोन्ही संघातील संबंध ताणले गेले आहेत. मात्र, काल रात्री क्वेट्टा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा भारताकडून निषेध करण्यात आला आहे. आम्ही कोणत्याही हिंसेचे समर्थन करत नसून क्वेट्टामध्ये झालेल्या हानीबद्दल आम्हाला दु:ख आहे, असे पर्रिकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. दहशतवाद पसरवणाऱ्यांना कोणत्याही देशाने पाठिंबा देणे योग्य नाही. दहशतवाद कधीतरी पाठिंबा देणाऱ्यांवरही उलटू शकतो, असे सूचक विधान पर्रिकर यांनी केले आहे.

पाकिस्तानमधील बलुचिस्तान प्रांतातील क्वेट्टा शहरातील पोलीस प्रशिक्षण केंद्रावर काल दहशतवाद्यांनी केलेल्या आत्मघाती हल्ल्यात ६० जण ठार झाले होते. सुरवातीला दहशतवाद्यांनी जोरदार गोळीबार केला. त्यानंतर स्वतःला उडवून दिले. या वेळी प्रशिक्षण केंद्रात सुमारे २५०     जण उपस्थित होते. हल्ल्यानंतर अनेक जण आपला जीव वाचविण्याचा प्रयत्न करत होते. छतावरून उडी मारल्याने अनेकजण जखमी झाले आहेत.