जम्मू काश्मीरच्या अनंतनागमध्ये सोमवारी दिवसाढवळ्या दहशतवाद्यांनी एक बँक लुटली. तीन ते चार दहशतवादी बँकेत दाखल झाले आणि त्यांनी बंदुकीचा धाक दाखवून रक्कम लुटली आणि पळून गेले. या सगळ्या दहशतवाद्यांनी बुरखा घातला होता मात्र ही सगळी घटना बँकेच्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांना मिळालं आहे. त्या आधारे या प्रश्नी पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अनंतनागमधील अरवानीमध्ये जम्मू काश्मीर बँकेची शाखा आहे. या बँकेत बुरखा घातलेले चार ते पाच दहशतवादी आले आणि त्यांनी बँकेतील ५ लाख २० हजारांची रक्कम लुटून नेली. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज आमच्या हाती लागलं आहे, मिळालेल्या प्राथमिक माहितीवरून या दरोड्यामागे हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचा हात असावा असाही अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला होता. त्यानंतर काश्मीरच्या खोऱ्यात बँक लुटण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. दहशतवाद्यांनी बंदुकीचा धाक दाखवून आत्तापर्यंत १२ बँका लुटल्या आहेत असंही पोलिसांनी म्हटलं आहे.