भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवादी तळ उद्धवस्त केले होते. या सर्जिकल स्ट्राईकमध्ये सुमारे ४० दहशतवाद्यांचा खात्मा झाला होता. भारताच्या सर्जिकल स्ट्राईकचा तेथील दहशतवाद्यांनी मोठा धसका घेतला आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळावरून दहशतवाद्यांनी पळ काढला आहे. या तळावरून दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिले जाते. एबीपीने दिलेल्या वृत्तानुसार सर्जिकल स्ट्राईकनंतर दहशतवाद्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तिथे प्रशिक्षण घेत असलेल्या ५०० पैकी ३०० दहशतवाद्यांनी पळ काढला आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील २४ दहशतवादी तळावरून अतिरेकी पळून गेल्याचे वृत्त आहे.
२६/११ हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाबला प्रशिक्षण देण्यात आलेल्या मुझफ्फराबाद येथील मानशेरामधील दहशतवादी तळही रिकामा झाला आहे. कसाबने स्वत: इथे प्रशिक्षण घेतल्याची कबुली दिली होती. पाकिस्तानी लष्कराने बंदुकीच्या जोरावर पळून जाणाऱ्या दहशतवाद्यांना भारताविरोधात लढण्यासाठी रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु ते यशस्वी झाले नाही.
भारतीय लष्कराने बुधवारी (दि. २८ सप्टेंबर) रोजी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवादी अड्डे उद्धवस्त केले होते. यात मोठ्याप्रमाणात दहशतवादी ठार झाले होते. पाकिस्तानने भारताच्या सर्जिकल स्ट्राईकचा दावा खोडून काढला होता. भारताने सर्जिकल स्ट्राईक नव्हे तर शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याचे म्हटले होते. यात फक्त आमचे दोन जवान ठार झाल्याचे सांगितले होते. पाकिस्तानने या जवानांचे फोटोही जारी केले होते. हे दोन्ही जवान हवालदार होते. यातील एकाचे नाव जुम्मा खान तर दुसऱ्याचे नाव इम्तियाज असे होते. भारताने उरी हल्ल्याचा बदला म्हणून पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राईक करून दहशतवादी व पाक सैन्यांना कंठस्नान घातले. या धक्क्यातून सावरायच्या आतच पाकिस्तानच्या इराण सीमारेषेवर इराण सैन्य दलाने पाकिस्तानमध्ये उखळी तोफा डागल्या होत्या.