ललित मोदी प्रकरणामुळे संसदेत उठलेले वादळ अद्याप शमण्याची चिन्हे नाहीत. पावसाळी अधिवेशनाचा सलग आठवा दिवस कामकाजाविना संपला. राज्यसभेत विरोधक व सत्ताधाऱ्यांच्या परस्परांविरोधातील घोषणाबाजीमुळे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावे
लागले.
विरोधकांचा गोंधळ इतका होता की पंजाबमधील गुरूदासपूरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याची माहिती देण्यासाठी उभे राहिलेल्या राजनाथ सिंह यांचे बोलणेही ऐकू जात नव्हते. गुरूदासपूरमधील दहशतवादी पाकिस्तानातूनच भारतात आल्याचे सांगून राजनाथ सिंह यांनी अत्यंत कठोर शब्दात या हल्ल्याची निंदा केली.
राजनाथ सिंह म्हणाले की, दहशतवादी पाकिस्तानातून भारतात दाखल झाले होते. जीपीएस यंत्रणेवरून दहशतवादी पाकिस्तानातून आल्याचे निष्पन्न झाले आहे.
गुरूदासपूर जिल्ह्य़ातील तास क्षेत्रातून दहशतवाद्यांनी पंजाबमध्ये घुसखोरी केली. या क्षेत्रातून रावी नदी वाहते. याच दहशतवाद्यांनी जम्मू पठाणकोट रेल्वे मार्गावरील दीनानगर व झलकोदीजवळ पाच बॉम्ब लावले होते. मात्र सुरक्षारक्षकांनी ते निकामी केले. या हल्ल्याचा निषेध करताना राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला खडसावले.
सर्वपक्षीय बैठक?
लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी संसदेतील कोंडी फोडण्यासाठी बैठक बोलावली होती. मात्र त्यात तोडगा निघाला नाही. त्यामुळे आता सरकार सर्वपक्षीय बैठक बोलावण्याची शक्यता आहे. तसे संकेत सरकारने दिले आहेत.

…तर आम्ही चोख प्रत्युत्तर देऊ- राजनाथ सिंह
दरम्यान, राजनाथ सिंह राज्यसभेत निवेदन सादर करीत असताना काँग्रेस खासदारांनी गोंधळ घातला. सभागृहाच्या मोकळ्या जागेत येऊन विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. विरोधकांच्या गोंधळामुळे राज्यसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.
पंजाबच्या गुरूदारपूरमध्ये सोमवारी तीन दहशतवाद्यांनी केलेल्या या हल्ल्यात सहा जण मृत्युमुखी पडले होते. यामध्ये एका पोलीस अधीक्षकांसह तीन पोलीसांचा आणि तीन सामान्य नागरिकांचा समावेश आहे. ११ तासांच्या संघर्षानंतर तिन्ही दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलांना यश आले होते.