अमेरिकेतील विद्युत मोटारनिर्मात्या टेस्ला मोटर्स या कंपनीने तीन हजार डॉलर्सची बॅटरी प्रदर्शित केली असून, तिचा वापर घरांमध्ये करता येणार आहे. विशेष म्हणजे ही बॅटरी सौर ऊर्जा साठवू शकणार आहे.
कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलन मस्क यांनी सांगितले की, जगातील विजेच्या पायाभूत सुविधेत क्रांतिकारी बदल या बॅटरीमुळे घडून येईल. ही बॅटरी पुन्हा भारित (चार्ज) करता येणारी असून ती लिथियम-आयन बॅटरी प्रकारातील आहे. विजेच्या मोटारींसाठी वापरतात तशीच बॅटरी टेस्लाने निर्माण केली आहे. पॉवरवॉल असे या बॅटरीचे नामकरण करण्यात आले असून त्यात निवासी वापरासाठी वीज साठवण्याची क्षमता आहे. सौरऊर्जाही त्यात साठवता येते. यातील ७ किलोव्ॉट-तास क्षमतेच्या बॅटरीची किंमत ३००० डॉलर्स असणार आहे, तर १० किलोव्ॉट-तास क्षमतेच्या बॅटरीची किंमत ३५०० डॉलर्स असणार आहे. सौर ऊर्जेशी जोडल्यानंतर ७ किलोव्ॉट-तास क्षमतेची बॅटरी जास्त पर्यावरण स्नेही असेल व त्यात रात्री सूर्यप्रकाश नसतानाही साठवलेल्या सौर ऊर्जेवर दिवे लावता येतील.
पहिल्यांदा तुम्हाला सगळे घर बॅटरीवर चालवता येईल असे कंपनीचे सह संस्थापक व ट्री हाऊसचे अध्यक्ष जॅसन बॅलार्ड यांनी सांगितले. ही कंपनी टेस्ला बरोबर पॉवरवॉलच्या विक्रीत सहभागी आहे. त्यांनी सांगितले की, वॉटर हिटर, डिशवॉशर ही उपकरणेही आगामी काळात बॅटरीवर चालवण्याचा दिवस दूर नाही. त्या दिशेने पडलेले हे पहिले पाऊल आहे. जीवाश्म इंधनांनी होणारे प्रदूषणही त्यामुळे कमी होईल.