पाकिस्तानी शरियत न्यायालयाचा निर्णय

अपत्यप्राप्तीसाठी ‘टेस्ट टय़ूब बेबी’ पद्धतीचा वापर करणे हे ‘कायदेशीर व न्यायसंगत’ असल्याचा निर्णय पाकिस्तानच्या शरियत न्यायालयाने दिला असून, त्यामुळे वैद्यकीय गुंतागुंतीच्या कारणाने अपत्यसुखापासून वंचित असलेल्या देशातील दांपत्यांना दिलासा मिळाला आहे.

जर वडिलांकडून शुक्राणू आणि आईकडून बीजांड गोळा करून त्यांचे वैद्यकीय प्रक्रियेद्वारे परीक्षानलिकेत फलन करण्यात आले आणि त्यातून तयार झालेला गर्भ वास्तविक आईच्या गर्भाशयात स्थापित करण्यात आला, तर ही प्रक्रिया ‘कायदेशीर व न्यायसंगत’ आहे, असा निर्णय संघराज्य शरियत न्यायालयाने मंगळवारी दिला.

ही प्रक्रिया बेकायदेशीर किंवा पवित्र कुराण किंवा सुन्ना यांच्या शिकवणीच्या विरोधात असल्याचे म्हटले जाऊ शकत नाही, असे बीजांड व शुक्राणूंच्या कृत्रिम संयोगाबाबत (इन-व्हिट्रो फर्टिलायझेशन- आयव्हीएफ) दिलेल्या २२ पानी निकालात न्यायालयाने सांगितल्याचे वृत्त ‘डॉन’ वृत्तपत्राने दिले आहे.

ही प्रक्रिया वैध असण्याचे कारण, शुक्राणू व बीजांड हे वास्तविक वडील व आईचे आहेत. या दांपत्याने निर्धारित वैद्यकीय प्रक्रियेचा अवलंब करायचे ठरवले, तर कायदेशीर मुलाच्या जन्माच्या संदर्भात कुठलाही प्रश्न उपस्थित करता येऊ शकत नाही. अशा प्रकारे जन्माला आलेले मूल हे सर्व प्रकारे कायदेशीर व औरस राहील, असे न्यायालयाने स्पष्टपणे सांगितले.

तथापि टेस्ट टय़ूब बेबी मिळवण्यासाठी इतर कुठलीही अट ही गैरइस्लामिक राहील. पैशांसाठी किंवा इतर कारणासाठी एखादी महिला ‘सरोगेट मदर’ होण्यास राजी होत असेल, तर ही संपूर्ण प्रक्रिया तसेच त्यातून होणारा मुलाचा जन्म हा बेकायदेशीर ठरेल, असे न्यायालयाने स्पष्ट केले.