थायलंड लष्कराने केलेल्या उठावाला देशातील हजारो लोकांनी जोरदार विरोध करतानाच रविवारी निदर्शकांनी तणावग्रस्त राजधानीत मोर्चा काढला. या वेळी देश सोडा, देश सोडा, अशा जोरदार घोषणाबाजीने सारा परिसर दणाणून सोडला. आक्रमक निदर्शकांनी सैनिकांशी दोन हात केले. या वेळी लष्करी अधिकाऱ्यांनी मावळत्या सरकारमधील प्रमुख तीन अधिकाऱ्यांची हकालपट्टी केली.
गेल्या गुरुवारी लष्कराने देशाची सत्ता ताब्यात घेतली आहे. उठावविरोधी सुमारे १००० समर्थकांनी बँकॉक येथील व्यापारी संकुलाजवळ जोरदार निदर्शने केली. देश सोडा, देश सोडा, अशा घोषणा समर्थकांनी देण्यास सुरुवात केल्यानंतर वातावरण काही मिनिटांत तंग झाले. समर्थकांनी आपला मोर्चा स्कायट्रेन आणि शॉपिंग मॉलकडे वळवण्याचा प्रयत्न करताच सैनिकांनी त्यांचा मार्ग अडवला. या वेळी निदर्शकांची सैनिकांशी झोंबाझोंबी झाली.
अमेरिकन वकिलातीवर मोर्चा नेण्याचे निदर्शकांनी ठरवल्याचे कळाल्यानंतर सैनिकांनी त्या बाजूकडील रस्त्यावर अडथळे निर्माण केले. लष्करप्रमुख जनरल प्रायुथ चान-ओचा यांनी लष्करी उठावाविरोधात मोर्चा काढू नका, असा इशारा दिला होता.
सद्यस्थितीत लोकशाहीत मिळणारे अधिकार लोकांना बहाल करता येऊ शकणार नाहीत. समर्थकांकडून होणारी आंदोलने मोडून काढण्यासाठी संपूर्ण बँकॉक शहरात लष्कर तैनात करण्यता आले आहे, याशिवाय शहरात मार्शल लॉ लागू आहे, असे प्रायुथ यांनी स्पष्ट केले.  
प्रायुथ यांच्या नेतृत्वाखाली थायलंड सरकारकडील सर्व अधिकार लष्कराने आपल्या ताब्यात घेतले आहेत.
देशाच्या पंतप्रधान यिंगलुक शिनावात्रा यांच्या मावळत्या सरकारमधील १०० हून अधिक नेत्यांना नजरकैदेत ठेवण्याच्या कृतीचे प्रायुथ यांनी समर्थन केले. लष्कराने शनिवारी वरिष्ठ सभागृहातील १५० जणांना काढून टाकले आहे.