उत्तर प्रदेशात पुन्हा ‘रामराज्य’ स्थापित करण्यासाठी प्रयत्न सुरु असून आजच्या दिवाळीच्या दिवसापासून या प्रयत्नांच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. या खास मुहूर्तावर १३५ कोटी रुपयांच्या विविध योजनांचा शुभारंभ करण्यात आला आहे. त्यामुळे २०१९पर्यंत उत्तर प्रदेशात रामराज्य अवतरणार असल्याची ग्वाही उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज येथे दिली.

रामजन्मभूमी म्हणून पुराणात प्रसिद्ध असलेल्या अयोध्येत आजवर झाली नाही अशी ऐतिहासिक दिवाळी साजरी करण्यात येत आहे. अयोद्धानगरीत सरयू नदीच्या काठी सर्वत्र दिव्यांची आरास करण्यात आली आहे. ज्याप्रमाणे इतिहासात श्रीरामाचे वनवासातून परतल्यानंतर अयोध्येत स्वागत करण्यासाठी दिवाळी साजरी करण्यात आली होती. त्यावेळी त्यांचे पुष्पक विमानातून आगमन झाले होते. त्याप्रमाणे आज श्रीरामाच्या रुपातील रामाचे हेलिकॉप्टरमधून येथे आगमन झाले, त्यांचे स्वतः मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्वागत केले. त्यांच्या कपाळी टिळा लावून आरतीही केली.

या औचित्यानिमित्त शरयू नदीच्या घाटावर सुमारे दोन लाख दिवे लावण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच खास ‘लेझर शो’ आणि ‘रामलीला’ कार्यक्रमाचे देखील येथे आयोजन करण्यात आले होते. या सर्व तयारीमुळे येथे सध्या राम भक्तांची गर्दी झाली आहे.

आजच्या मुख्य कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री आदित्यनाथ म्हणाले, अयोध्या नेहमीच नकारात्म चर्चेचे केंद्र राहीले आहे. त्यामुळे हा कार्यक्रम नकारात्मकतेवरुन सकारात्मकतेकडे नेणारा आहे. अयोध्येचा विकास हा चार टप्प्यात पूर्ण केला जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. अयोध्येला उत्तर प्रदेश सरकार जागतिक पर्यटनाचे हब बनवणार आहे. त्याची सुरुवातही आता झाली आहे. अयोध्येने जुने वैभव पुन्हा प्राप्त करावे यासाठी कामे केली जात आहेत. केंद्र सरकारच्या मदतीने प्रत्येकाच्या डोक्यावर छत आणि प्रत्येक हाताला काम मिळेल यासाठी वेगाने प्रयत्न केले जात आहेत.

प्रत्येकाचे स्वतःचे घर असावे, या घरात वीज असावी आणि प्रत्येकाला रोजगार उपलब्ध होणे हेच ‘रामराज्य’ आहे. रामराज्याचे हे स्वप्न २०१९ पर्यंत साकार होणार असल्याचे आदित्यनाथ यावेळी म्हणाले.