यंदाच्या पुलित्झर  पत्रकारिता पुरस्कारात ‘दी न्यूयॉर्क टाइम्स’ या वृत्तपत्राने ठसा उमटवला असून एकूण तीन पुरस्कार पटकावले आहेत. पुरस्काराचे हे ९९ वे वर्ष होते. सेंट लुईस वृत्तपत्राला ब्रेकिंग न्यूज फोटोग्राफी पुरस्कार मिसॉरीतील फर्गसन येथील वांशिक दंगल छायाचित्रांच्या माध्यमातून दाखवल्याबद्दल मिळाला आहे. दक्षिण कॅरोलिनातील चार्लसटन येथील ‘द पोस्ट अँड कुरियर’ या वृत्तपत्राला मानाच सार्वजनिक सेवा पुरस्कार मिळाला असून त्यांनी देशातील महिलांची दयनीय स्थिती दक्षिण कॅरोलिनावर आधारित शोध मालिकेतून दाखवून दिली होती.
दी न्यूयॉर्क टाइम्सच्या कर्मचाऱ्यांना इबोलाच्या बातम्यांसाठी आंतरराष्ट्रीय वार्ताकनाचा पुरस्कार विभागून मिळाला आहे. पश्चिम आफ्रिकेत इबोलाची साथ आली होती. न्यूयॉर्क येथील कोलंबिया विद्यापीठाच्या समितीने पुरस्कारार्थीची निवड केली आहे. न्यूयॉर्क टाइम्सचे वार्ताहर एरिक लिप्टन यांना ‘दबावगटांचा प्रभाव’ या वृत्तमालिकेसाठी शोधपत्रकारितेचा पुरस्कार मिळाला आहे. मुक्त छायाचित्रकार डॅनियल बेरेहुल्क यांना इबोलाच्या वृत्तांकनात फीचर फोटोग्राफीचा पुरस्कार मिळाला आहे. एएफपीच्या बुलेन्ट किलिक यांना सीरिया तुर्कीच्या सीमेवरून कुर्द लोक पळतानाच्या छायाचित्रासाठी पुरस्कार मिळाला आहे. दी न्यूयॉर्क टाइम्स या वृत्तपत्राने चार गटात पाच वेळा अंतिमफेरी गाठली आहे.
 सेंट लुईस डिसपॅच वृत्तपत्राच्या छायाचित्रकाराला फर्गसन येथे एका कृष्णवर्णीय नि:शस्त्र व्यक्तीस गेल्या ऑगस्टमध्ये पोलिसांनी ठार केल्याच्या घटनेत पुरस्कार मिळाला आहे. त्या वेळी मायकेल ब्राऊन या १८ वर्षांच्या मुलाला ठार केल्यानंतर देशात निषेधाचे सूर उमटले होते, त्या वेळी पोलिसांनी बळाचा अतिरेक केला होता. लॉसएंजलिस टाइम्सला फीचर लेखन व समीक्षा यासाठी पुलित्झर पुरस्कार मिळाला आहे. दी वॉल स्ट्रीट जर्नल व दी वॉशिंग्टन पोस्ट या वृत्तपत्रांना एकेक पुरस्कार मिळाला आहे. वॉल स्ट्रीट जर्नललाशोध पत्रकारितेचा पुरस्कार विभागून मिळाला आहे. दी वॉशिंग्टन पोस्टला राष्ट्रीय वार्ताकनासाठी पुरस्कार मिळाला आहे.
पत्रकारितेशिवाय कादंबरीचे पुलित्झर अँथनी डोएर यांच्या ‘ऑल द लाइट वुई कॅनॉट सी’ या कादंबरीला मिळाला आहे. चरित्रलेखनाचा पुरस्कार डेव्हीड केर्टझर यांच्या द पोप अँड मुसोलिनी – द सिक्रेट हिस्टरी ऑफ पियस एलेव्हन अँड द राइज ऑफ फॅसिझम इन युरोप या पुस्तकाला मिळाला आहे.

पुरस्कार विजेते
     ’सामाजिक सेवा- दी पोस्ट अँड कुरियर, चार्लसट्न.
     ’ब्रेकिंग न्यूज- दी सियाटल टाइम्स कर्मचारी.
     ’शोध पत्रकारिता- एरिक लिप्टन, दी न्यूयॉर्क टाइम्स व दी वॉल स्ट्रीट जर्नलचे पत्रकार.
     ’स्पष्टीकरणात्मक वार्ताकन- झाचारी मिडर, ब्लूमबर्ग न्यूज.
     ’स्थानिक वार्ताकन- रॉब कुझिना व रिबेका किमिच तसेच फ्रँक सुरासी, डेली ब्रीझ, टोरान्स.
     ’राष्ट्रीय वार्ताकन- कॅरॉल डी. लिओनिंग – दी वॉशिंग्टन पोस्ट.
     ’आंतरराष्ट्रीय वार्ताकन- दी न्यूयॉर्क टाइम्सचे पत्रकार.
     ’फीचर लेखन- डायना मारकम- दी लॉसएंजल्स टाइम्स.
     ’टिप्पणी पत्रकारिता- लिसा फालकेनबर्ग- दी ह्य़ूस्टन क्रोनिकल.
     ’समीक्षा- मेरी मॅकनमारा- दी लॉस एंजल्स टाइम्स.
     ’संपादकीय लेखन- कॅथलीन किंग्जबरी – द बोस्टन ग्लोब.
     ’संपादकीय व्यंगचित्रे- अॅडम झिगलिस, द बफेलो न्यूज.
     ’ब्रेकिंग न्यूज फोटोग्राफी- सेंट लुईस पोस्ट कर्मचारी.
     ’फीचर फोटोग्राफी- डॅनियल बेरेहुलक, दी न्यूयॉर्क टाइम्स.