जगातील सर्वाधिक कार्यरत राहिलेली युद्धनौका हा बहुमान लाभलेली ‘आयएनएस विराट’ ही भारतीय नौदलातील विमानवाहू युद्धनौका आज तिच्या शेवटच्या प्रवासाला मुंबईच्या नौदल तळावरुन कोच्चीकडे निघाली. कोच्ची येथे आयएनएस विराटची आवश्यक देखभाल दुरुस्ती केली जाईल. नौदलाच्या पश्चिम मुख्यालयात हेलिकॉप्टर आणि जलद गस्ती नौकांनी यावेळी विराटला सोबत केली. जवळपास ५७ वर्षे सेवा केल्यानंतर ही युद्धनौका सेवानिवृत्त होत आहे.
कोच्ची येथे २७ तारखेला पोहचल्यानंतर या युद्धनौकेवरच्या महत्वाच्या तोफा, रडार, इंजिन काढले जाईल. ‘आयएनएस विराट’च्या सेवानिवृत्तीनंतर या युद्धनौकेचा संग्रहालयात समावेश करण्याचा प्रस्ताव आहे. मात्र यावर संरक्षण खात्याने अजून निर्णय दिलेला नाही. आपल्या ५७ वर्षांच्या सेवेतील २९ वर्षे या युद्धनौकेने भारतीय नौदलाच्या सेवेत व्यतित केली आहेत. व्यक्ती असेल तर आपल्याकडे ५८ किंवा साठीला सेवानिवृत्ती देण्याची प्रथा आहे. मात्र युद्धनौकेच्या बाबतीत हा खूप मोठा कालखंड आहे कारण तिचे आयुष्यमानच २५ वर्षांचे गृहीत धरलेले असते. फार तर त्यात वेळोवेळी केलेल्या डागडुजीनंतर १० ते १५ वर्षांनी तिचे आयुष्यमान वाढविले जाते. मात्र ‘आयएनएस विराट’ ही तब्बल ५८ वर्षे सेवा करीत असलेली जगातील एकमेव युद्धनौका ठरली आहे. फेब्रुवारी महिन्यात विशाखापट्टणम येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय नौदल ताफा संचलनाच्या वेळेसच ‘आयएनएस विराट’च्या निवृत्तीचे संकेत मिळाले होते.

आयएनएस विराट
मूळ नाव- एचएमएस हर्मिस (इंग्लंडचे शाही नौदल)
शाही नौदलात दाखल- २५ नोव्हेंबर १९५९
१९८६ साली भारतीय नौदलाकडून खरेदी
१९८७ साली मे महिन्यात ‘आयएनएस विराट’ असे नामकरण
भारतीय नौदलाच्या पश्चिमी ताफ्यात दाखल- १२ मे १९८७
वेळोवेळी केलेली महत्त्वपूर्ण डागडुजी
एप्रिल १९८६, जुलै १९९९, नोव्हेंबर २००४, ऑगस्ट २००८
नोव्हेंबर २००९ आणि नोव्हेंबर २०१३
बोधवाक्य- जलमेव यस्य, बलमेव तस्य
वजन- २३ हजार ९०० टन
पूर्ण वजनी क्षमता – २८ हजार ७०० टन
लांबी- २२६. ५ मीटर्स (७४३ फूट)
नेहमी पाण्याखाली राहणारा
भाग- सुमारे २९ फूट
वेग- ताशी २८ सागरी मैल (प्रतितास ५२ किलोमीटर्स)
युद्धनौकेवर काम करणाऱ्या नौसैनिकांची एकूण संख्या – १२०७
युद्धनौकेवरील लढाऊ विमानांसाठीचा कर्मचारी वर्ग- एकूण १४३
युद्धनौकेवरील लढाऊ विमाने- १६ सी हॅरिअर्स, ४ सीकिंग
हेलिकॉप्टर्स, २ चेतक आणि ४ ध्रुव