वांद्र्यातील पोटनिवडणुकीत नारायण राणेंचे काय होणार, याकडेच बुधवारी महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळाचे लक्ष होते. या निवडणुकीत राणेंना शिवसेनेच्या तृप्ती सावंत यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. महाराष्ट्राचे लक्ष याच पोटनिवडणुकीकडे असले, तरी देशात अन्य दोन ठिकाणी झालेल्या पोटनिवडणुकीत लागलेले निकालही तितकेच लक्षवेधी आहेत.
उत्तराखंडमधील भगवानपूरमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत कॉंग्रेसचा उमेदवार विजयी झाला. हा विजय पक्षासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या विजयामुळे पहिल्यांदाच उत्तराखंडमधील विधानसभेत कॉंग्रेसने स्वबळावर बहुमताचा आकडा पार केला आहे. तेथील हरिश रावत यांच्या नेतृत्त्वाखालील सरकार घटक पक्षांच्या पाठिंब्यावर आत्तापर्यंत सत्तेत होते. आता पहिल्यांदाच येथील कॉंग्रेसचे सरकार स्वबळावर सत्तेत आले आहे. २०१२ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत उत्तराखंडमध्ये कॉंग्रेसने ३२ जागांवर तर भाजपने ३१ जागांवर विजय संपादन केला होता.
पंजाबमधील धुरी येथे झालेल्या पोटनिवडणुकीमुळे तेथील सत्ताधारी शिरोमणी अकाली दलाच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे. धुरीमध्ये शिरोमणी अकाली दलाचा उमेदवार विजयी झाल्यामुळे तिथेही या पक्षाने विधानसभेत स्वबळावर बहुमत मिळवले आहे. पंजाबमध्ये शिरोमणी अकाली दलाला भाजपचा पाठिंबा आहे. मात्र, आता शिरोमणी अकाली दलाने स्वबळावर बहुमत मिळवल्याने मित्रपक्षाच्या दबावाखाली काम करण्याची त्यांना गरज पडणार नाही. एकूण ११७ सदस्यसंख्या असलेल्या पंजाबमधील विधानसभेत शिरोमणी अकाली दलाकडे आता ५९ आमदार आहेत. त्याचवेळी भाजपकडे १२ आमदार आहेत.