दुसऱ्या जागतिक महायुद्धात जपानमधील हिरोशिमा शहरावर अमेरिकेच्या बी-२९ विमानातून अणुबॉम्ब टाकण्यात सक्रिय सहभाग असलेल्या कर्मचाऱ्याचे वयाच्या ९३ व्या वर्षी सोमवारी निधन झाले. थिओडोर व्हॅन किर्क असे या कर्मचाऱ्याचे नाव होते.
‘एनोला गे’ असे नाव असलेल्या बी-२९ जातीच्या विमानातून किर्क यांनी ६ ऑगस्ट १९४५ रोजी हिरोशिमावर ‘लिटल बॉय’ हा अणुबॉम्ब टाकला. त्यामध्ये हिरोशिमा शहराच्या निम्म्याहून अधिक लोकसंख्येइतके म्हणजे एक लाख ४० हजार जण ठार झाले. किर्क हे त्यावेळी २४ वर्षांचे होते.
जॉर्जियातील स्टोन माऊण्टन येथील राहत्या घरात किर्क यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाच्या वृत्ताला त्यांच्या पुत्राने दुजोरा दिला, असे न्यूयॉर्क टाइम्सने म्हटले आहे. एनोला गे या विमानाचा वैमानिक कर्नल पॉल टिब्बेट्स होता आणि त्यामध्ये १२ कर्मचारीही होते. मरियाना बेटावरून हे विमान उडाले होते आणि त्यावर युरेनियम बॉम्ब लादलेले होते. याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आलेली होती.