गुजरातमध्ये पाटीदार आरक्षण आंदोलनाचे नेतृत्व केल्यानंतर सध्या मध्य प्रदेशमध्ये शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरून सक्रीय झालेल्या हार्दिक पटेलला सध्या तरी निवडणूक लढवायची नाही. इंदूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत त्याने आपले मत व्यक्त केले. निवडणूक लढवण्याचा माझा कोणताच विचार नाही. माझा कुठला राजकीय हेतू नाही किंवा कुठल्या राजकीय पक्षाचा मी चेहराही नाही. मी केवळ समाज, कृषी क्षेत्रातील मुद्द्यांवर संघर्ष करत आलो, असे त्याने स्पष्ट केले.

निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय मी योग्यवेळी घेईल, असेही त्याने या वेळी सांगितले. गुजरातचे दिग्गज नेते शंकरसिंह वाघेला यांच्याबाबत बोलताना तो म्हणाला, वाघेला यांचे वय ७७ आहे. वयाच्या मानाने काँग्रेस सोडण्याचा त्यांचा निर्णय योग्य आहे. परंतु, येत्या विधानसभा निवडणुकीसाठी वाघेलांबरोबर युती करण्याबाबत आपली कुठली योजना नाही. याविषयावर आमचे बोलणेही झाले नसल्याचे त्याने म्हटले.

हार्दिकने मध्य प्रदेशमधील मंदसौर जिल्ह्यात शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनावेळी पोलिसांच्या गोळीबारात ५ लोक ठार झाले होते. त्याचा निषेध हार्दिकने केला. शिवराजसिंह चौहान यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारवर टीका करताना गुजरातप्रमाणे मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांचा आवाज दाबला जात असल्याचा आरोप केला.

मी वारंवार मध्य प्रदेशमध्ये येणार. कोणाला काय करायचे ते करा. येत्या काही महिन्यांत ग्वाल्हेर व इतर ठिकाणी होणाऱ्या शेतकऱ्यांच्या सभेत भाग घेणार असल्याचे आव्हानच त्याने या वेळी दिले.

देशभरातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ व्हावे. ५० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या शेतकऱ्यांना निवृत्तीवेतन मिळावे आणि राष्ट्रीय कृषक आयोगाची स्थापना व्हावी. त्याचबरोबर मध्य प्रदेशातील मंदसौर आणि नीमच जिल्ह्यात मागील महिन्यात झालेल्या आंदोलनावेळी शेतकऱ्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याची मागणी केली.