पुढील मुख्यमंत्री आमदारच निवडतील, असे समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायमसिंह यादव यांनी स्पष्ट केले आहे. पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाकडून अखिलेश यादव यांचा चेहरा वापरणार की नाही, त्यांना प्रचारात स्थान देणार की नाही, याबद्दल अजून कोणताही निर्णय झालेला नाही. ४३ वर्षांच्या अखिलेश यादव यांनी राज्यात रथ यात्रा काढण्याचा निर्णय घेतला आहे. ३ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱया या रथयात्रेच्या माध्यमातून अखिलेश हजारो किलोमीटरचा प्रवास करणार आहेत. मात्र या यात्रेसाठी तयार करण्यात आलेला ऑडिओ आणि व्हिडीओ समाजवादी पक्षाच्या जुन्या चौकटीबाहेरचा आहे.

समाजवादी पक्षात आणि यादव कुटुंबात काहीच आलबेल नाही, हे आता जगजाहिर झाले आहे. त्याचेच प्रतिबिंब अखिलेश यांच्या रथयात्रेसाठी तयार करण्यात आलेल्या ऑडिओ आणि व्हिडीओमध्ये दिसून येते आहे. वडिल मुलायमसिंह यादव यांच्या प्रभावातून बाहेर पडण्याचा प्रयत्न या व्हिडीओमधून अखिलेश यांनी केला आहे. यादव-अल्पसंख्याक यांच्यासोबत सर्वांना सोबत घेऊन चालण्याचा निर्धार या ऑडिओ-व्हिडीओमधून व्यक्त करण्यात आला आहे.

अखिलेश यांच्या या व्हिडीओची सुरुवात एक वचनाने होते. ‘प्रत्येक दिवशी मी उत्तर प्रदेशचे भविष्य घडवण्याचे वचन देतो’, या वाक्याने व्हिडीओची सुरुवात होते. विशेष म्हणजे यानंतर अखिलेश, त्यांची पत्नी डिंपल आणि मुलांसह नाश्ताच्या टेबलजवळ बसलेले दिसतात. हा व्हिडिओ परिवार, जनता आणि विकास या संकल्पनेवर आधारित आहे. या व्हिडीओच्या शेवटी ‘उत्तर प्रदेश, भारत… मेरा परिवार’, असा संदेश दिसतो.

या जाहिरातीमध्ये अखिलेश यादव त्यांच्या कार्यालयात जाताना, तरुणांशी संवाद साधताना दाखवण्यात आले आहेत. दिवसभर कामकाज करणारे, लोकांना भेटणारे अखिलेश यादव या व्हिडीओमध्ये दिसत आहेत. मात्र यामध्ये मुलायमसिंह यादव, शिशुपाल सिंह कुठेच दिसत नाहीत. या दोन्ही नेत्यांच्या छायाचित्रांचादेखील व्हिडीओमध्ये वापर करण्यात आलेला नाही. त्यामुळे संपूर्ण उत्तर प्रदेशच माझा परिवार आहे म्हणत अखिलेश यांनी आपल्या परिवारातील मंडळींना योग्य तो संदेश दिला असल्याचे बोलले जात आहे.