ब्रिटनची युरोपियन संघातून बाहेर पडण्याची प्रक्रिया सुरू झाली असून ब्रिटनच्या राजदूतांनी पंतप्रधान थेरेसा मे यांचे कलम ५०शी संबंधित पत्र ब्रसेल्समध्ये युरोपियन परिषदेला सादर केले आहे. त्यानुसार ब्रिटनची युरोपियन संघातून बाहेर पडण्यासाठी द्विवार्षिक चर्चा प्रक्रिया सुरू होणार आहे.

लिस्बन करारातील कलम ५० लागू करण्यासंबंधी थेरेसा मे यांनी स्वाक्षरी केलेले पत्र युरोपियन संघाकडे सोपविण्यात आले आहे. त्याचप्रमाणे युरोपियन संघातील सदस्यांनाही याबाबतची माहिती देण्यात आली आहे. थेरेसा मे यांचे युरोपियन संघातील राजदूत टीम बॅरो यांनी युरोपियन परिषदेचे अध्यक्ष डोनाल्ड टस्क यांच्याकडे मे यांचे पत्र सोपविले असून त्यामुळे ब्रिटनची युरोपियन संघातून बाहेर पडण्यासाठी चर्चा प्रक्रिया सुरू झाली आहे.  मे यांनी बुधवारी सकाळी आयोजित बैठकीत युरोपियन संघातून बाहेर पडण्याच्या प्रक्रियेस सुरुवात झाल्याचे स्पष्ट केले. संपूर्ण ब्रिटनमध्ये प्रत्येक नागरिकाला प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळेल, असे आश्वासनही मे यांनी यावेळी दिले.

युरोपियन संघातून बाहेर पडल्यामुळे प्रत्येक नागरिकाच्या हक्कांचे रक्षण करणे शक्य होणार आहे. तसेच, देशांतर्गत संधी वाढतील आणि सर्व नागरिकांची स्वप्ने साकार होण्यास मदत होणार असल्याचे मे म्हणाल्या. ब्रिटनमध्ये चांगल्या नागरिकांचा समुदाय असून युरोपियन संघातून बाहेर पडून आपण इतिहास रचत आहोत. त्यामुळेच युरोपियन संघातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. विरोधी पक्षनेते जेरमी कोर्बेन यांनी युरोपियन संघातून बाहेर पडण्याच्या निर्णयाचा आदर करत असल्याचे स्पष्ट केले.