पर्यटन मंत्रालयाच्या ‘वारसा दत्तक योजने’ अंतर्गत १४ स्मारकांच्या देखभालीसाठी ७ कंपन्यांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. दिल्लीत आयोजित ‘पर्यटन पर्व’ या उपक्रमात या नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले. भविष्यात या कंपन्या ‘स्मारक मित्र’ म्हणून कार्यरत राहणार आहेत.

यात दिल्लीतील जंतरमंतरच्या देखभालीसाठी ‘एसबीआय फाऊंडेशन’चे नाव निश्चित करण्यात आले आहे. कोणार्क मधील सुप्रसिद्ध सुर्यमंदिर, भुवनेश्वरमधील राजा-राणी मंदिर आणि ओडिशामधील रत्नागिरी स्मारकाच्या देखभालीचे काम ‘टी. के. इंटरनॅशनल लिमिटेड’ला सोपवण्यात येणार आहे. कर्नाटक मधील हंपी, जम्मू-कश्मीर मधील लेह पॅलेस, दिल्लीतील कुतुबमिनार आणि महाराष्ट्रातील अजिंठा लेण्यांच्या देखभालीची जबाबदारी ‘यात्रा ऑनलाईन प्रा.लि.’कडे सोपवण्यात येणार आहे.

कोचीमधील मत्तान चेरी पॅलेस संग्रहालय आणि दिल्लीतील सफदरगंज मशिदीची देखभाल ‘ट्रॅव्हल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ करणार आहे. गंगोत्री मंदिर क्षेत्र आणि गोमुख तसेच जम्मू-कश्मीरमधील माऊंट स्टोकंग्रीच्या देखभालीची जबाबदारी ‘ॲडव्हेंचर टुर ऑपरेटर असोसिएशन ऑफ इंडिया’ करणार असून, दिल्लीतील अग्रसेन की बावलीची देखभाल ‘स्पेशल हॉलिडेज ट्रॅव्हल प्रा. लि.’ करणार आहे. दिल्लीमधील पुराना किला या वास्तुच्या देखभालीसाठी ‘एनबीसीसीच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.