जालियनवाला बागेतील शहिदांच्या विहिरीतील ३ हजार रुपयांवर चोरटय़ांनी डल्ला मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे. १९१९ मध्ये ब्रिटिशांनी केलेल्या गोळीबारापासून वाचण्यासाठी शेकडो लोकांनी या विहिरीत उडय़ा घेतल्या होत्या.

१५ फूट खोल असणाऱ्या या विहिरीमध्ये उतरण्यासाठी चोरटय़ांनी दोरखंडाचा वापर केला. विहिरीतील खिडकीचे ग्रिल आणि जाळी तोडून ते आतमध्ये गेले. या घटनेत आतापर्यंत एकास ताब्यात घेण्यात आले असून, यामध्ये आणखी दोन संशयित आहेत. यामध्ये त्यांनी जवळपास ३ हजार रुपये चोरी केले आहेत. चोरी करण्यात आलेल्या पैशांमध्ये मुख्यत्वे नाण्यांचा समावेश आहे, असे अमृतसरचे पोलीस आयुक्त एस. एस. श्रीवास्तव यांनी सांगितले.

या विहिरीजवळ कोणताही सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यात आलेला नाही. या ठिकाणी सुरक्षेसाठी एका सुरक्षारक्षकाची नेमणूक करण्यात आली होती. मंगळवारी रात्री चोरीबाबत कल्पना आली नाही. मात्र बुधवारी सकाळी मिळालेल्या दोरखंडानंतर चोरी झाल्याचे स्पष्ट झाले, असे त्यांनी सांगितले.

असा इतिहास..

१३ एप्रिल १९१९ ला ब्रिटिश कर्नल रेनिवाल्ड डायर याने बागेमध्ये उपस्थित असणाऱ्या लोकांवर गोळीबार करण्याचे आदेश दिले होते. जालियनवाला बागेमध्ये फिरण्यास येणारे लोक शहीद झालेल्या लोकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी विहिरीमध्ये पैसे दान करतात.