नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याबाबतच्या गोपनीय फायली खुल्या करण्यापूर्वी त्याचा आंतरराष्ट्रीय संबंधांवर होऊ शकणारा परिणाम लक्षात घेऊनच केंद्र सरकारकडून निर्णय घेतला जावा, असे मत केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री एम. व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केले.

त्यांनी एका कार्यक्रमाच्या पाश्र्वभूमीवर वार्ताहरांना सांगितले की, पश्चिम बंगाल सरकारने नेताजींबाबतच्या काही गोपनीय फायली काल उघड केल्या असून ते ठीक आहे पण केंद्राने त्यांच्या अखत्यारीतील गोपनीय फायली खुल्या करण्यापूर्वी त्यातील माहितीचा आंतरराष्ट्रीय संबंधांवर तसेच शेजारी देशांशी संबंधांवर परिणाम होऊ शकतो, याचा विचार करणे आवश्यक आहे, केंद्र सरकारने त्यातील माहितीचा अभ्यास करावा.
लोकांना नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याबाबत माहिती जाणून घेण्याचा अधिकार आहे पण सरकारने त्या फाईल्स केव्हा व कशा खुल्या करायच्या याचा निर्णय विचाराअंती घ्यावा. नेताजी सुभाषचंद्र बोस गूढरीत्या बेपत्ता झाल्याच्या घटनेला ७० वर्षे झाली आहेत व त्यांच्याबाबतची १३ हजार गोपनीय पाने काल पश्चिम बंगाल सरकारने खुली केली, त्या कागदपत्रांनुसार स्वतंत्र भारतात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कुटुंबीयांवर पाळत ठेवण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. पण सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू १९४५ मध्ये विमान अपघातात झाल्याचे मानले जाते त्याबाबत कुठलेही स्पष्टीकरण त्या कागदपत्रातून मिळालेले नाही.
पोलीस व सरकार यांच्या लॉकर्समध्ये असलेली १२७४४ पाने काल खुली करण्यात आली. त्यावेळी बोस यांच्या कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.