‘रामनाथ गोएंका एक्सलन्स इन जर्नालिझम’ या पुरस्कार सोहळ्यात बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता आमिर खानने देशातील वाढत्या असहिष्णुतेबाबत आपले मतप्रदर्शन केले. तो एव्हढ्यावरच थांबला नाही तर देशातील सद्यपरिस्थिती पाहता पत्नी किरणने देश सोडण्याविषयीही विचारणा केली होती, असेही त्याने पुढे सांगितले. आमिरच्या या वक्तव्यावरून देशभर टीकेचे वादळ उठले. समाज माध्यमांवरदेखील या वादळाने ‘पिंगा’ घातला. टि्वटरकरांनी आमिरवर वाकबाणांचा प्रहार केला. या सगळ्यात अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्कोमध्ये राहणारी एक व्यक्ती नाहक भरडली गेली. टि्वटरकर जेव्हा आमिर खानवर शरसंधान साधत होते. तेव्हा ह्या व्यक्तिच्या टि्वटर खात्यावर सतत नोटिफिकेशन्स दाखल होत होती. का? कारण त्याचे नावदेखील आमिर आहे. आमिर खानचे टि्वटर हॅण्डल @amir असे नसून @aamir_khan असे आहे. आमिर इफ्राती (Amir Efrati) ‘दी इन्फॉर्मेशन’च्या या पत्रकाराला आमिर खानविषयीच्या टि्वटमध्ये सतत @Amir म्हणून टॅग करण्यात येत आहे. गंमतीचा भाग म्हणजे तोसुद्ध प्रत्येक टि्वट विनोदी मजकूर लिहून रिटि्वट करत आहे.