दिल्लीत महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये भाजपला मोदी लाटेमुळे नव्हे तर ईव्हीएम लाटेमुळे विजय मिळाल्याचा आरोप आम आदमी पक्षाचे (आप) मंत्री गोपाळ राय यांनी केला. गेल्या दहा वर्षांपासून या पालिकांमध्ये भाजप सत्तेत आहे. याठिकाणी जनता अनेक समस्यांचा सामना करत आहे. मात्र, तरीदेखील जनता भाजपलाच निवडून देत आहे, ही गोष्ट न पटण्यासारखी आहे, असे सांगत गोपाळ राय यांनी पुन्हा एकदा ईव्हीएम मशिन्सवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. देशात लोकशाहीच्या मार्गाने नव्हे तर ईव्हीएम मशिन्सद्वारे भवितव्य ठरवले जात आहे. मात्र, यापासून लोकशाही वाचवली पाहिजे, असे गोपाळ राय यांनी म्हटले.

दिल्लीतील महानगरपालिका निवडणुकांच्या बुधवारी जाहीर झालेल्या निकालानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. मतमोजणीच्या सुरूवातीच्या टप्प्यापासूनच भाजपने मोठी आघाडी घेतली. उत्तर, दक्षिण आणि पूर्व दिल्ली यापैकी एकाही महानगरपालिकेत भाजपला काँग्रेस किंवा आप कडवी टक्कर देऊ शकलेले नाहीत. या तिन्ही महानगरपालिकांच्या एकूण २७० जागांपैकी १८० जागांवर भाजपने स्पष्ट आघाडी घेतल्याचे चित्र आहे. तर काँग्रेस आणि आप यांच्यात दुसऱ्या स्थानासाठी चुरस आहे. काँग्रेस ३५, आप ४५ आणि इतर पक्ष १० जागांवर आघाडीवर आहेत. त्यामुळे आता या तिन्ही ठिकाणी भाजप सहजपणे आपली सत्ता कायम राहणार, हे आता जवळपास स्पष्ट झाले आहे.

तर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे माध्यम सल्लागार नागेंदर शर्मा यांनीदेखील या पराभवासाठी ईव्हीएम मशिन्सला जबाबदार धरले आहे. गेल्या कित्येक वर्षात दिल्लीचे रस्ते साफ न करताही भाजपने विरोधकांना साफ केले आहे. जेव्हा मशिन्स तुमच्यासोबत असतात तेव्हा लोकांशी संबंध असण्याचे काही कारण नसते, असे नागेंदर शर्मा यांनी सांगितले.