मोदीगेट प्रकरणावरून काँग्रेसने परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज आणि बनावट पदवीवरून स्मृती इराणी यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यावर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी ‘राजीनामे घ्यायला हे काही त्यांचे सरकार नाही, रालोआचे आहे’, अशा शब्दांत ही मागणी फेटाळली आहे.
लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनाला २१ जुलैपासून सुरुवात होणार आहे. यावर सरकारच्या मंत्रिमंडळातील दोन मंत्री वादाच्या भोवऱ्यात सापडले असताना पावसाळी अधिवेशन सुरळीत कसे चालेल, यावर पत्रकारांनी छेडले असता त्यांनी हे उत्तर दिले. युवक काँग्रेस संघटनेने बुधवारी शास्त्री भवनसमोर आंदोलन छेडत परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आणि मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांचे त्वरित राजीनामे घेण्याची मागणी केली. ही मागणी फेटाळून लावल्यावर स्पष्टीकरण देताना दूरसंचारमंत्री रवी शंकर प्रसाद यांनी काँग्रेसच्या मंत्र्यांनी जे केले ते आपल्या मंत्र्यांनी केले नसल्याचे सांगितले. यामुळे त्यांच्याकडून राजीनामा घेण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे प्रसाद म्हणाले.