पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सिंगापूर दौऱ्यात अपेक्षा
महासागर, अवकाश आणि सायबर शक्ती ही राष्ट्रा-राष्ट्रांमधील स्पर्धागृहे बनण्याऐवजी एकत्रित समृद्धीची प्रतीके बनावीत, अशी अपेक्षा व्यक्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दक्षिण चिनी समुद्रातील वर्चस्वावरून आक्रमक पवित्रा घेणाऱ्या चीनवर निशाणा साधला. या समुद्रावरून चीन व पूर्व आशियाई देशांमध्ये पूर्वीपासून वाद सुरू आहेत. आता या वादात अमेरिकेनेसुद्धा उडी घेतल्यामुळे चीन अधिकच आक्रमक झाला आहे. त्या पाश्र्वभूमीवर चीनला कानपिचक्या देताना मोदी यांनी भारत-चीन सीमाप्रश्न मिटला नसतानाही उभय देशांनी सरहद्दीवर शांतता राखल्याबद्दल चीनचे कौतुक करत दुसरीकडे त्याला चुचकारण्याचाही प्रयत्न केला.
जागतिक मनुष्यबळाच्या बाबतीत चीन व भारताचा एकत्रित वाटा दोन पंचमांश इतका आहे. दोन्ही देश परस्परांच्या मदतीसाठी साहाय्यभूत ठरू शकतील. दोन्हीही देश एकत्रितरीत्या व्यापारापासून पर्यावरण बदलापर्यंतचे सर्वच प्रश्न प्रभावी पद्धतीने हाताळू शकतील, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. दहशतवादाविरोधात सर्व देशांनी एकमेकांच्या सुरात सूर मिसळावेत, अशी अपेक्षा व्यक्त करताना त्यांनी पाकिस्तानवरही निशाणा साधला. या प्रदेशातील सर्वच देशांशी भारत आर्थिक सहयोग करारांनी जोडला गेला असला, तरी अधिक व्यापक अशा आर्थिक भागीदारी करारांनी त्यांच्याशी संबंध अधिक बळकट करण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी दिले.