अतिवेगवान रेल्वेगाडय़ांच्या रुळांची उभारणी करण्यासाठी चीनसोबत करण्यात आलेल्या कराराबाबत नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष माँटेकसिंग अहलुवालिया यांनी मंगळवारी चीनला सुनावले. या व्यापारी करारात असंतुलन निर्माण झाल्याने त्याचा भारताला ३५०० कोटी डॉलरचा तोटा झाला आहे, असे अहलुवालिया यांनी सांगितले.
बीजिंगमध्ये सुरू असलेल्या अर्थसामरिक संवाद परिषदेत अहलुवालिया बोलत होते. भारत व चीन यांच्यातील व्यापारात असंतुलन वाढत आहे. त्याचा फटका भारताला बसत असल्याचे अहलुवालिया यांनी निदर्शनास आणून दिले. ‘व्यापार हा आर्थिक सहकार्याचा महत्त्वाचा निर्देशक असतो. त्यामुळे व्यापाराचा विस्तार वाढवण्याचा आमचा प्रयत्न आहे. २०१५पर्यंत व्यापारात १० हजार कोटी डॉलरचे लक्ष्य गाठण्याचे आमचे ध्येय आहे. मात्र केवळ एका देशाने प्रयत्न केले तरच व्यापार संतुलित राहू शकत नाही. त्यासाठी व्यापारी संबंध असलेल्या देशांचे सामूहिक प्रयत्न गरजेचे असतात,’’ असे अहलुवालिया म्हणाले.
गेल्या तीन वर्षांपासून दरवर्षी भारताला सुमारे ३५०० कोटींचा तोटा होत आहे, असेही त्यांनी सांगितले. भारतातून चीनमध्ये होणारी निर्यात वाढल्यास व्यापार स्थित होऊ शकतो, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.