प्रगाश बॅंडमधील किशोरवयीन मुलींना फेसबुकवर धमकावणाऱया तीन जणांना पोलिसांनी गुरुवारी अटक केली. फेसबुकवर धमकावण्यात आल्यानंतर आणि काश्मीर खोऱयातील कट्टरपंथीयांनी त्यांच्या विरोधात आवाज उठविल्यानंतर या मुलींनी आपला रॉक बॅंड बंद केला. 
इर्शाद अहमद छारा, तारिक खान आणि रमीज शाह अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. जम्मू-काश्मीर पोलिसांनी विविध ठिकाणी छापे टाकून या तिघांना अटक केली.
जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी पोलिसांच्या कारवाईचे स्वागत केले. बॅंडमधील मुलींना धमकावणाऱयांना शोधून काढून अटक केली ते चांगलेच झाले. या प्रकरणात अजून कोणी गुन्हेगार असेल, तर त्यालाही अटक केली पाहिजे, असे ट्विट अब्दुल्ला यांनी केले आहे.
या बॅंडमधील मुली ज्या भागात राहातात, तेथील पोलिसांची गस्त वाढविण्यात यावी, अशा सूचना दिल्या आहेत, असे जम्मू-काश्मीरचे पोलिस महासंचालक अशोक प्रसाद यांनी सांगितले.
प्रगाश बॅंडच्या प्रसिद्धीसाठी फेसबुकवर तयार केलेल्या पेजवर एकूण ९०० प्रतिक्रिया आल्या होत्या. त्यापैकी २६ प्रतिक्रिया या मुलींना धमकावणाऱया होत्या. या प्रतिक्रिया जेथून टाकण्यात आल्यात. त्याचा इंटरनेट प्रोटोकॉलही (आयपी) पोलिस शोधत आहेत.