लोकसभा निवडणुकीआधी बिहारमध्ये सत्ताधारी जनता दल युनायटेड आणि भाजप यांच्यामध्ये काडीमोड झाल्यावर गेल्या दोन वर्षांच्या काळात राज्यातील जातीय दंगलींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. ‘द इंडियन एक्स्प्रेस’ने केलेल्या पाहणीतून ही माहिती पुढे आली आहे.
सन २०१० पासून बिहारमध्ये जदयू आणि भाजप संयुक्तपणे सत्तेत होते. तेव्हापासून २०१३ पर्यंत संपूर्ण राज्यात जातीय दंगलीच्या २२६ घटना घडल्या होत्या. मात्र, लोकसभा निवडणुकीत भाजपने नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार जाहीर केल्यावर बिहारमधील या दोन्ही पक्षांतील युती संपुष्टात आली. त्यामुळे २०१३ साली भाजप सत्तेतून बाहेर पडला. पण त्यानंतर गेल्या महिन्यापर्यंत बिहारमध्ये जातीय दंगलींच्या ६६७ घटना घडल्या आहेत. आधीच्या तीन वर्षांच्या तुलनेत गेल्या दोन वर्षांमध्ये या आकडेवारीत लक्षणीय वाढ झाली असल्याचे पाहणीतून स्पष्ट झाले.
बिहारमधील ३८ जिल्ह्यांमध्ये दोन महिने या संबंधीची पाहणी करण्यात आली. हेतुपुरस्सर या दंगली भडकवण्यात आल्याचेही पाहणीमध्ये आढळून आले. त्यामध्ये धार्मिक ठिकाणी प्राण्यांचे अवशेष फेकणे, मिरवणुकीवेळी दुसऱया समाजाकडून प्रक्षोभक घोषणा दिल्या जाणे, मूर्तींची विटंबना करणे ही कारणे असल्याचेही दिसून आले आहे.