हैदराबाद विद्यापीठातील दलित विद्यार्थी रोहित वेमुलाच्या आत्महत्येची घटना ताजी असतानाच तामिळनाडूत तीन विद्यार्थीनींनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. महाविद्यालयातील अपुऱ्या सोयी सुविधांच्या अभावामुळे या मुलींनी आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. तर गेल्या १ महिन्यांपासून या विद्यार्थीनींचे महाविद्यालय प्रशासनाविरोधात आंदोलन सुरू होते.
वैद्यकीय आणि चिकित्सा संशोधन महाविद्यालयात शिकणाऱ्या या तीनही मुली द्वितीय वर्षात शिक्षण घेत होत्या. या तिघींनीही महाविद्यालय परिसरातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. तर आत्महत्येपूर्वी लिहलेल्या पत्रात त्यांनी महाविद्यालय प्रशासनच मृत्यूला कारणीभूत असल्याचे म्हटले आहे.
गेल्या १ महिन्यांपासून या मुलींकडून अपुऱ्या सोयीसुविधांबद्दल महाविद्यालयाचा निषेध नोंदवण्यात येत होता. मात्र, विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाची तीव्रता गेल्या आठवड्यात वाढली होती. मात्र, प्रशासनाकडून त्याची कोणतीही दखल घेण्यात आली नाही. दरम्यान, या आत्महत्येप्रकरणी संस्था चालकाच्या मुलाला पोलिसांनी अटक केली आहे.