गुरुवारी रात्री सेवोक रोड येथे दोन महिला मोटारीने जात असताना हेल्मेटने चेहरा झाकलेल्या दोघा दुचाकीस्वारांनी त्यांच्यावर अ‍ॅसिड फेकले व ते पळून गेले. यात महिला व गाडीचा चालक भाजले असून त्यांना खासगी रूग्णालयात नेण्यात आले. या महिलांची स्थिती चिंताजनक आहे.

सिंहस्थसाठी केंद्राकडे निधीची मागणी
नवी दिल्ली : जुलै २०१५ ते ऑगस्ट २०१६ या कालावधीत नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे भरणाऱ्या सिंहस्थ कुंभसाठी विविध सोयीसुविधा पुरविणे शक्य व्हावे यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, असा प्रस्ताव महाराष्ट्र सरकारकडून आला असून त्यावर केंद्र सरकार विचार करीत आहे, असे शुक्रवारी लोकसभेत स्पष्ट करण्यात आले. कुंभमेळा आयोजित करणे हा राज्य सरकारच्या अखत्यारीतील विषय आहे, तरीही विषयाचे महत्त्व लक्षात घेऊन महाराष्ट्राच्या प्रस्तावावर गांभीर्याने विचार सुरू आहे, असे नियोजनमंत्री राव इंद्रजितसिंह यांनी सांगितले.

मध्य प्रदेशात शालेय शिक्षणात योगाभ्यास
भोपाळ : संयुक्त राष्ट्रसंघाने २१ जून हा ‘आंतरराष्ट्रीय योगाभ्यास दिन’ पाळण्याबाबतचा ठराव केला ही भारतासाठी अभिमानाची बाब असल्याचे नमूद करून मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी शालेय शिक्षण अभ्यासक्रमात योगाभ्यासाचा समावेश करण्याची घोषणा शुक्रवारी विधानसभेत केली.
विधानसभेचे अध्यक्ष डॉ. सीताशरण शर्मा यांनी चौहान यांच्या निवेदनाला पाठिंबा दिला. भारतासाठी ही अभिमानाची बाब असल्याचे ते म्हणाले.

दोन खटल्यांत झरदारींना दिलासा
इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी अध्यक्ष असिफ अली झरदारी यांची भ्रष्टाचाराच्या दोन प्रकरणांतून न्यायालयाने शुक्रवारी निर्दोष मुक्तता केली. एआरवाय गोल्ड आणि उरसस ट्रॅक्टर भ्रष्टाचार प्रकरणात झरदारी यांचे नाव होते. नवाझ शरीफ यांचे १९९० मध्ये सरकार असताना झरदारी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप ठेवण्यात आले होते. न्यायालयाने भ्रष्टाचाराच्या दोन प्रकरणांमधून झरदारी यांची मुक्तता केली असली तरी १९९० च्या दशकांतील एसजीएस आणि कॉटेक्नाप्रकरणी त्यांच्यावर अद्यापही आरोप आहेत. दोन प्रलंबित प्रकरणांची सुनावणी १७ डिसेंबर रोजी होणार आहे.

‘उबर’चालकांची दिल्लीत निदर्शने
नवी दिल्ली : दिल्लीत उबर टॅक्सीसेवेवर घालण्यात आलेली बंदी उठवावी, या मागणीसाठी शुक्रवारी शेकडो ‘उबर’चालकांनी जंतरमंतर येथे निदर्शने केली. उबर टॅक्सीत एका युवतीवर बलात्कार झाल्याने सरकारने या कंपनीवर बंदी घातल्याने आमच्या उदरनिर्वाहाच्या साधनाला फटका बसला, असे निदर्शकांचे म्हणणे आहे. केवळ एका व्यक्तीने अयोग्य, अक्षम्य वर्तन केले त्याची शिक्षा सर्वाना देणे योग्य नाही, असेही चालकांचे म्हणणे आहे. बलात्कार केला त्या चालकाकडे अखिल भारतीय परवाना होता, असा परवाना देताना चालकाची गुन्हेगारी पाश्र्वभूमी तपासली जाते, याकडे लक्ष वेधण्यात आले आहे.