आसाम-नागालॅण्ड सीमेवर झालेल्या हिंसक तणावाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दखल घेतल्यानंतर केंद्रीय गृह मंत्रालयाने बुधवारी त्यांच्या कार्यालयास घटनांचा अहवाल सादर केला. दरम्यान, या हिंसाचारात नऊ जण ठार, तर १० हजार लोक बेघर झाले आहेत. तर हिंसाचाराचा विरोध करण्यासाठी गेलेल्या निदर्शकांवर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात तीन जण ठार झाले आहेत. तर राजकीय पटलावरही या हिंसाचाराचे पडसाद उमटले आहेत.
आसामच्या गोलघाट जिल्ह्य़ात आठवडाभरापूर्वी झालेल्या हिंसाचाराची माहिती देण्यासंबंधी पंतप्रधानांचे मुख्य सचिव नृपेन्द्र मिश्रा यांनी गृह मंत्रालयास विस्तृत अहवाल पाठविण्याची सूचना केली होती. नागालॅण्डमधील सशस्त्र गटांनी आसामच्या गावकऱ्यांवर हल्ला चढविला होता. त्यानंतर तेथील परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी गृह मंत्रालयाने निमलष्करी दलाचे एक हजार अधिकारी तणावग्रस्त सीमेवर पाठविले होते. याप्रकरणी आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगोई यांनी केंद्रीय राखीव पोलीस दलावर अकार्यक्षमतेचा ठपका ठेवला तर गोगोइंच्या आरोपात तथ्य नसल्याचे केंद्रीय गृह राज्यमंत्री किरण रिज्जू यांनी स्पष्ट केले.
बेमुदत संचारबंदी लागू
आसाममधील रंगाजोन गावातील रहिवाशांना मंगळवारी घराबाहेर काढून पोलिसांनी त्यांच्यावर अमानुष लाठीमार केल्याच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरलेल्या निदर्शकांवर केलेल्या गोळीबारात तीन जण ठार, तर सहा जण जखमी झाले. बुधवारी संतप्त जमावाने गोलाघाट येथील पोलीस उपायुक्तांचे कार्यालय आणि पोलीस ठाणे पेटवण्याचा प्रयत्न केला.
पोलीस उपायुक्त कार्यालय आणि पोलीस ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या सुमारे एक हजार निदर्शकांना रोखण्यासाठी पोलीसांनी सुरुवातीला अश्रूधुराच्या नळकांडय़ा फोडल्या, परंतु जमावाने त्याला दाद न देता पोलिसांच्या दिशेने जोरदार दगडफेक करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी जमावाच्या दिशेने गोळीबार केला. यात तिघे ठार झाले.