दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात अरवानी येथे गुरूवारी सकाळी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत लष्कर ए तोयबाचे ३ दहशतवादी मारले गेले. यातील एका दहशतवाद्याची ओळख पटली असून त्याचे नाव जुनैद मट्टू असल्याचे सांगण्यात येत आहे. चकमकीनंतर संपूर्ण परिसरात कोम्बिग ऑपरेशन राबवण्यात येत आहे.
अनंतनाग येथील बिजबहेडा परिसरातील हसनपोरा गावात दहशतवादी असल्याची गोपनीय माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती, अशी माहिती एका पोलिस अधिकाऱ्याने दिली. त्यानंतर लगेचच दहशतवाद्यांचा शोध घेण्यास सुरूवात केली. तपाससत्र सुरू असतानाच लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा जवानांवर गोळीबार करण्यास सुरूवात केली. भारतीय जवानांनीही त्याला चोख प्रत्युत्तर दिले. यात तीन दहशतवादी ठार झाले.

भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्तानकडून सातत्याने भारतीय सीमारेषेवर गोळीबार करण्यात येत आहे. तसेच भारतात घुसण्यासाठी दहशतवाद्यांना मदत करण्यात येत असल्याचेही दिसून आले आहे. उरी हल्ल्यानंतर काही दिवसांपूर्वी नागरोटा येथील लष्करी तळावरही दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. त्यात भारतीय जवानांबरोबर अधिकारीही शहीद झाले होते. पाकिस्तानला वारंवार पुरावे देऊनही त्यांच्याकडून कारवाई होताना दिसत नाही. गुरूवारीही दहशतवादी अनंतनाग जिल्ह्यात आल्याचे समजताच दक्ष असलेल्या जवानांनी शोध सत्र सुरू केले. जवानांना पाहून बिथरलेल्या दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार करण्यास सुरूवात केली. भारतीय जवानांनीही चोख प्रत्युत्तर देत तीन दहशतवाद्यांना यमसदनी धाडले.