ब्रिटनने ३० ठकसेन आणि करबुडव्यांची यादी जाहीर केली असून, त्यामध्ये भारतीय वंशाच्या तीन जणांचा समावेश आहे. या तीन जणांनी सर्वसामान्यांना जवळपास १० दशलक्ष पौंडांना गंडा घातला आहे.
सदर तिघा भारतीयांची नावे सुमीर सोनी, अनिश आनंद आणि साहील जैन अशी असून त्यांच्या नावाने वॉरण्ट जारी करण्यात आले आहेत.
सोनी हा यॉर्कशायर प्रांतातील ब्रिटिश रहिवासी असून त्याच्यावर अल्कोहोलची बेकायदा विक्री आणि वितरण करून ३.६ दशलक्ष पौंड कर बुडविल्याचा आरोप आहे. जानेवारी महिन्यात तो मॅन्टेस्टर येथील न्यायालयात हजर राहिला नाही. सध्या तो केनियात दडून बसला असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
आनंद या परदेशस्थ भारतीयावर सहा दशलक्ष पौंड व्हॅट बुडविल्याचा आरोप असून तो क्रॉयडॉन न्यायालयात हजर राहिला नाही. त्याला गेल्या महिन्यात सात वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठाविण्यात आली आहे. आनंद हा अनेक कंपन्यांवर संचालक असून त्या कंपन्या बनावट आहेत. सध्या तो ब्रिटनमध्येच दडून बसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
जैन याच्यावरही तीन लाख २८ हजार पौंड व्हॅट बुडविल्याचा आरोप असून, तोही ब्रिटनमध्येच दडून बसल्याचे सांगण्यात येत आहे. ओल्ड बेली न्यायालयात तोही गैरहजर राहिला. एचएम रेव्हेन्यू आणि कस्टम्सने मोस्ट वॉण्टेडची यादी जाहीर केली असून त्यामध्ये या तीन भारतीयांचा समावेश आहे.