छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दंतेवाडा येथे सुरक्षा दलाकडून नक्षलवाद्यांच्या तळावर आज (सोमवारी) कारवाई करण्यात आली. यामध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवादी दोन्ही बाजूने जोरदार गोळीबार करण्यात आला. या कारवाईत तीन नक्षलवाद्यांना सुरक्षा दलाच्या जवानांनी अटक केली आहे.

मार्चमध्ये सुकमा जिल्ह्यात झालेल्या नक्षलवादी हल्ल्यानंतर सुरक्षा दलाने आपल्या कारवाईचा वेग वाढविला आहे. सुकमा येथे झालेल्या हल्ल्यात या हल्ल्यात सीआरपीएफच्या १२ जवानांचा मृत्यू झाला होता. त्याच पार्श्वभूमीवर सुरक्षा दलाची ही कारवाई मागील अनेक दिवसांपासून चालू आहे.

दिवसेंदिवस देशात वाढत असलेल्या नक्षलवादी हल्ल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर सुरक्षा दल आणि पोलिस दलाकडून छत्तीसगडमध्ये विशेष कारवाई करण्यात येत आहेत. पोलिस दलाने आठवडाभरापूर्वीही सुकमा भागातून १० नक्षलवाद्यांना ताब्यात घेतले होते.

यशिवाय बस्तर नक्षली कमांडर विलास याचा शोध घेऊन त्याला ठार करण्यात आले होते. मात्र तरीही नक्षलवादी कारवाया चालूच असल्याचे चित्र आहे. याशिवाय सुरक्षा दलाकडून राबविण्यात आलेल्या मोहीमेत १५ नक्षलवाद्यांनाही ठार करण्यात आले होते.