अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम पाकिस्तानात राहत असलेल्या नऊ ठिकाणांपैकी तीन पत्ते चुकीचे आढळल्याचा अहवाल संयुक्त राष्ट्र संघाच्या (युनो) एका समितीने दिला आहे. भारताने पाकिस्तानातील दाऊदच्या विविध ठिकाणांची माहिती असलेला दस्तावेज युनोला सादर केला होता. या ठिकाणी दाऊद वारंवार येत असल्याचे भारताने दस्तऐवजात म्हटले होते. चुकीचे तिन्ही पत्ते समितीने यादीतून वगळले आहेत.
भारताने दाऊदचा म्हणून दिलेला एक पत्ता युनोच्या राजदूत मालेहा लोधी यांचा असल्याचे समोर आले आहे. मेन प्रॉपर्टी, मार्गेला रोड, एफ-६/२ स्ट्रीट नं. २२, घर नं. ०७, इस्लामाबाद. हा पत्ता लोधी यांचा आहे. त्याचबरोबर आठवा मजला, मेहरान स्क्वेअर, परदेशी हाऊस-३, तलवार एरिआ, क्लिफ`टन, कराची, पाकिस्तान आणि ६/अ, कजुबाम तंजीम, फेज-५, डिफेन्स हौसिंग एरिया, कराची, पाकिस्तान हे दोन्ही पत्ते चुकीचे असल्याचे समितीने म्हटले असून तेही यादीतून वगळण्यात आले आहेत.
दाऊद वारंवार पाकिस्तानातील आपली राहण्याची जागा बदलत असतो. तो या नऊ ठिकाणी वारंवार जात असल्याचे भारताने म्हटले होते. मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात भारताने पाकिस्तानला दिलेल्या दस्तऐवजात या नऊ पत्त्यांचा समावेश केला होता. दाऊद हा पाकिस्तानात नसल्याचा दावा तेथील सरकारकडून नेहमी केला जातो. विशेष म्हणजे पाकिस्तानच्या दिवंगत पंतप्रधान बेनझीर भुटटो यांचा मुलगा बिलावलच्या घराशेजारी दाऊद राहत असल्याचे भारताने यापूर्वी म्हटले होते.