दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू (जेएनयू) विद्यापीठात ९ फेब्रुवारी रोजी देण्यात आलेल्या देशविरोधी घोषणांच्या सातपैकी तीन क्लिप्समध्ये फेरफार करण्यात आल्याचे न्यायवैद्यक तपासणीत स्पष्ट झाले आहे. दिल्ली सरकारकडून संबंधित ध्वनिचित्रफितींचे काही नमुने हैदराबाद येथील सत्यता पडताळणी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. यापैकी तीन व्हिडिओ क्लिप्समध्ये गंभीर फेरफार करण्यात आल्याचे आढळून आले आहे. या क्लिप्समध्ये काही विशेष शब्द टाकण्यात आल्याचे तपासणीदरम्यान स्पष्ट झाले आहे.
आम आदमी (आप) सरकारने यापूर्वीच दिल्ली पोलिसांच्या याप्रकरणातील एकुण भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. या संपूर्ण प्रकरणातील घटना प्रकाशात येत आहेत त्यावरून ‘अभाविप’चा या सगळ्यातील वादग्रस्त सहभाग संशय उत्त्पन्न करणारा असल्याचा दावाही आप सरकारने केला होता. याप्रकरणाच्या चौकशीदरम्यान ‘जेएनयू’मध्ये ९ फेब्रुवारीला आंदोलन सुरू असताना सुरक्षारक्षकाने केलेले चित्रीकरण, विद्यापीठातील अंतर्गत सूत्रांकडून मिळालेली माहिती आणि प्रत्यक्षदर्शींचे जाबजबाब नोंदविण्यात आले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, अनेक ध्वनिचित्रफीती पाहिल्या असता कोणत्याच क्लिपमध्ये कन्हैया कुमार देशद्रोही नारे लगावताना दिसत नाही. विद्यापीठाच्या परिसरातील देशद्रोही घोषणाबाजीनंतर कन्हैयाने केलेल्या भाषणात तो देशविरोधी बोलला, असे एकाही प्रत्यक्षदर्शीने सांगितलेले नाही. याशिवाय, क्लिप्समध्ये त्यादिवशी पाकिस्तान जिंदाबाद अशाप्रकारच्या घोषणा दिल्याचेही ऐकू येत नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.