भारतीय ह्द्दीत चुकून घुसलेल्या तिघांची बीएसएफने मिठाई देऊन सुटका केल्याचे समोर आले आहे. सीमा सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार नारोवाल जिल्ह्यात ही घटना घडली. भारत आणि पाकिस्तानमधील तणावपूर्ण संबंध असताना बीएसएफने केलेली ही कामगिरी नक्कीच कौतुकास्पद आहे.
आमिर (वय १५), नोमिन अली (वय १४) आणि अरशद (वय १२) ही पाकिस्तानातील रिया गावातील तीन मुले आंतरराष्ट्रीय सीमेवरुन चुकून भारताच्या हद्दीत आली होती. या तिघांची व्यवस्थित चौकाशी करण्यात आली. हे तिघेही त्यांच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी जात होते. तेव्हा त्यांना भारताची हद्द कुठून सुरु होते हे न कळल्याने त्यांच्याकडून हद्द ओलांडली गेली. मात्र हे युवक चुकून भारताच्या हद्दीत आल्याने त्यांची सुटका करण्यात आली, अशी माहिती बीएसएफ जवान सीपी. मीना यांनी दिली. यावेळी भारतीय जवानांसोबतचा हा क्षण या मुलांच्या लक्षात राहावा म्हणून त्यांना चॉकलेट भेटस्वरुपात देण्यात आल्याचे बीएसएफ जवान सीपी. मीना यांनी सांगितले.
फैसलाबाद येथील शाळेत शिकणारा आमिर म्हणाला की, बीएसएफच्या जवानांनी माझा भाऊ, मित्र आणि मला जी वागणूक दिली त्याने मला आश्चर्य वाटले. ज्या जवानांनी आम्हाला हद्द पार केल्यावर अटक केली त्यांनी आमची व्यवस्थित काळजी घेतली. त्यांनी आम्हाला व्यवस्थित जेवणही दिले. जशी या जवानांनी आमची काळजी घेतली त्याप्रमाणे आमच्या सरकारनेही भारतीयांशी चांगली वर्तणूक करावी अशी माझी अपेक्षा आहे.