जम्मू-काश्मीरमधील गुरेज सेक्टरमध्ये दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न लष्कराच्या जवानांनी आज हाणून पाडला. जवानांनी तीन दहशतवाद्यांना ठार केलं. परिसरात आणखी काही दहशतवादी असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून जवानांनी शोधमोहीम सुरू केली आहे.

बांदीपोरा जिल्ह्यातील गुरेज सेक्टरमध्ये सीमारेषेवर संशयित हालचाली सुरू असल्याचं लष्कराच्या जवानांच्या लक्षात आलं. जवानांनी तातडीनं शोधमोहीम हाती घेतली. घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला. त्यांना जवानांनी प्रत्युत्तर दिलं. गोळीबारात तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं आहे. परिसरात आणखी दहशतवादी लपून बसल्याची शक्यता असल्यानं जवानांनी शोधमोहीम सुरू केली आहे.

दरम्यान, लष्करानं रविवारी मछिल सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला. जवानांनी केलेल्या गोळीबारात एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात आलं होतं. लष्कराच्या प्रवक्त्यांनी ही माहिती दिली होती. जम्मू-काश्मीरमध्ये यावर्षी आतापर्यंत लष्करानं २२ वेळा दहशतवाद्यांचा घुसखोरीचा डाव उधळून लावला आहे. जवानांनी राबवलेल्या शोधमोहीमेत ३८ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.