तीन धावत्या रेल्वे गाड्या एकाच ट्रॅकवर अचानक एकमेकांच्या जवळ आल्या. मात्र, या गाड्यांच्या मोटरमनने प्रसंगवाधान दाखवल्याने मोठा अनर्थ होता होता टळला. अलाहाबाद येथील एका रेल्वे क्रॉसिंगजवळ मंगळवारी हा प्रकार घडला.

रेल्वेच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘दुरांतो एक्स्प्रेस’ ही अलाहाबाद क्रॉसिंगजवळ सकाळी १० वाजता पोहोचली. त्याचवेळी रेल्वे ट्रॅकवर आलेल्या एका रिक्षाला धडक दिल्यानंतर ती रुळावर थांबली होती. त्याचवेळी ‘द हतिया आनंद विहार एक्स्प्रेस’ आणि ‘महाबोधी एक्स्प्रेस’ या दुरांतोच्या मागे धावत असताना त्यांना स्वयंचलित सिग्नलचा लाल दिवा लागल्याने सूचना मिळाली. त्यामुळे या दोन्ही गाड्यांच्या मोटरमनने रेल्वे क्रॉसिंगजवळ थांबलेली गाडी पाहताच इमर्जन्सी ब्रेक्स दाबले.

मध्य रेल्वेतील सूत्रांच्या सांगण्यानुसार, एकाच ट्रॅकवर रेल्वे गाड्या येणे ही दुर्मीळ घटना आहे. या प्रकारामुळे कुठलेही नुकसान झाले नसल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. स्वयंचलित सिग्नलचा लाल दिवा लागल्यामुळे या गाड्या थांबवण्यात आल्या. या अपघातातील रेल्वे ट्रॅकवर असणारी रिक्षा ताब्यात घेण्यात आली असून रिक्षाचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महाबोधी एक्स्प्रेसमधून प्रवास करणारा प्रवासी मंगलू राम याने सांगितले की, इमर्जन्सी ब्रेक्स दाबण्यात आल्याने आमच्या डब्यातील वरच्या बर्थवरील सामान खाली पडले. काहीतरी गंभीर घडल्याचे लक्षात आल्याने मी देखील रेल्वेतून बाहेर उडी मारली.

सुत्रांच्या माहितीनुसार, रेल्वे क्रॉसिंगजवळ असलेल्या रेल्वे स्टाफची ही चूक असून एकामागोमाग एक तीन एक्स्प्रेस गाड्या येणार होत्या. तरी त्यांनी दुरांतो थांबलेली असताना मागून येणाऱ्या गाड्यांसाठीचा इशारा देण्याबाबतच्या सूचना गेटमनला दिल्या नाहीत. थांबलेली दुरांतो मार्गस्थ होईपर्यंत इतर कुठल्याही गाडीला त्याच ट्रॅकवरुन जाण्याच्या सूचना द्यायच्या नसतात. मात्र, तसे झाले नाही यातून आदर्श नियमावलीचा भंग झाल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.