दिल्लीत १६ डिसेंबरला घडलेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर स्थळ नकाशा पोलीस ठाण्यात तयार करण्यात आल्याचा आरोप तपास अधिकाऱ्यांनी फेटाळून लावला आहे. मुलीच्या मित्राला घटनास्थळी नेऊन त्यानंतर त्याच्या सांगण्यानुसार तो तयार करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
तक्रारदार युवकाला घटनास्थळी नेले नव्हते या आरोपात तथ्य नसल्याचे महिला तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयात सांगितले. या प्रकरणातील आरोपी मुकेशच्या वकिलांनी घेतलेल्या उलटतपासणी दरम्यान तपास अधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यातच घटनेचा स्थळ नकाशा तयार केल्याचा मुद्दा खोडून काढला. घटनेच्या दिवशी संबंधित मुलगी मित्रासोबत बसमधून प्रवास करत होती. बसमध्ये इतर सहा जण होते. त्यात बसचालक, रामसिंह, विजय शर्मा, अक्षय ठाकूर, पवन गुप्ता आणि मुकेश यांचा समावेश होता. या सहा जणांनी या मुलीवर बलात्कार केल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान पीडित मुलीचे सिंगापूरमध्ये उपचार सुरू असताना २९ डिसेंबरला निधन झाले. या प्रकरणी चौकशी सुरू असताना तिहार कारागृहात एक आरोपी राम सिंहचे निधन झाले. तर एक आरोपी बालगुन्हेगार आहे. या प्रकरणी आरोपी मुकेशची जबानी घेतली नसल्याचा आरोपींच्या वकिलांचा दावाही तपास अधिकाऱ्यांनी खोडून काढला.