जॉर्जियाची राजधानी तिबलिसीत जोरदार पावसाने प्राणिसंग्रहालयातील अ‍ॅनिमल किंगडम रस्त्यावर आले असून वाघ, सिंह, पाणघोडे रस्त्यावर ताठ मानेने फिरत आहेत. त्यामुळे माणसांची मात्र पाचावर धारण बसली आहे. पुरामुळे प्राणिसंग्रहालयात पाणी जाऊन या प्राण्यांचा निवारा गेला त्यामुळे ते बाहेर पडले. या सगळ्या प्रकारानंतर १० जण ठार झाले असून त्यात प्राणिसंग्रहालयाच्या तीन कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. पण ते प्राण्यांच्या हल्ल्यात मरण पावले की पुरामुळे हे समजलेले नाही. जोरदार पाऊस वादळाने १० जण मरण पावले असे तेथील महापौर डेव्हीड नारमनिया यांनी सांगितले. शहरात ११ लाख लोकवस्ती आहे व लोकांना घरातच राहण्यास सांगण्यात आले आहे. चर्च पाडून प्राणिसंग्रहालय बांधले त्यामुळे पापाला शिक्षा मिळणारच त्यामुळेच प्राणी रस्त्यावर आले व सगळे आता घाबरले आहेत,  जेव्हा कम्युनिस्ट सत्तेवर आले तेव्हा त्यांनी चर्चमधील सर्व क्रॉसेस व घंटा वितळवण्यास सांगितले होते व त्यातून मिळालेला पैसा प्राणिसंग्रहालयात वापरला होता, असे जॉर्जियाच्या आर्थोडॉक्स चर्चचे इलिया दोन यांनी सांगितले.
सुटलेला पाणघोडा शहराच्या मुख्य चौकात आला. त्याला बेशुद्ध करणाऱ्या बंदुकीच्या साहाय्याने  (ट्रानक्विलायझर गन) शांत करण्यात आले.
काही प्राण्यांना पकडण्यात आले; पण तरी त्यांच्यातील किती सुटून पळाले याची माहिती मिळाली शकली नाही. या वेळी काही अस्वले पुराच्या पाण्यापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी इमारतींच्या वातानुकूलित यंत्रणेवर चढून बसली होती. तर लांडग्यांनी वन कर्मचाऱ्यांना हुलकावणी देत शहराबाहेर धूम ठोकली. दरम्यान, प्राण्यांच्या हल्ल्यात गलिको चिताझ हा कर्मचारी जखमी झाला असे सांगितले असले तरी गेल्या महिन्यात वाघाने त्याच्यावर हल्ला केला होता व त्यात त्याने हात गमावला होता.