पंजाबमधील गुरुदासपूर व काश्मीरमधील उधमपूर येथे झालेल्या दहशतवादी घटनांच्या आठवणी ताज्या असल्याच्या पाश्र्वभूमीवर उद्याच्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी संपूर्ण देशभरात चोख सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदी तिरंगा झेंडा फडकावणार असलेल्या राजधानी दिल्लीमध्ये जमिनीवरून हवेत मारा करणारी सुरक्षा साधने सज्ज ठेवण्यात आली आहेत.
संभाव्य दहशतवादी हल्ल्यांविरुद्ध सावध पहारा ठेवण्यासाठी दिल्लीत ४० हजारांहून अधिक सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. यापैकी निमलष्करी दले आणि दिल्ली पोलीस यांचे मिळून १२ हजाराहून अधिक जवान उच्च सुरक्षेच्या क्षेत्रात, विशेषत: पंतप्रधान मोदी देशाला संबोधित करणार असलेल्या ऐतिहासिक लाल किल्ल्याभोवती सज्ज राहणार आहेत. लाल किल्ला व आसपासच्या परिसरातील आकाश ‘नो फ्लाय झोन’ म्हणून घोषित करण्यात आले आहे. पंतप्रधान व इतर मान्यवर ज्या मार्गावरून लाल किल्ल्यावर जाणार आहेत, त्यावर सीसी टीव्ही कॅमेऱ्यांद्वारे नजर ठेवली जाणार आहे.
सुरक्षेचा भाग म्हणून लाल किल्ल्याच्या भाषणस्थळी पंतप्रधानांसाठी बुलेटप्रूफ काचेचे संरक्षण उभारण्यात आले आहे. मात्र मोदी या काचेमागून भाषण करतील की गेल्यावर्षीप्रमाणे खुल्या जागी उभे राहून बोलतील, हे अद्याप स्पष्ट नाही.
देशातील सर्व राज्यांच्या राजधान्यांसह मोठय़ा शहरांमध्येही सुरक्षेचे आवश्यक ते उपाय योजण्यात आले आहेत. स्वातंत्र्यदिनी हल्ला होण्याची विश्वासार्ह माहिती गुप्तचर संस्थांना मिळालेली नसली, तरी देशातील ताज्या दहशतवादी हल्ल्यांच्या पाश्र्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश यांना निर्देश जारी केले आहेत. पाकिस्तानमधील दहशतवादी गट आणि इंडियन मुजाहिदीनसारखे त्यांचे भारतातील संलग्न गट व सिमीचे माजी सदस्य लोटस टेंपल, नॉयडामधील मॉल्स, मेट्रो स्थानके, भाजपची कार्यालये आणि राजकीय नेते यांना लक्ष्य करू शकतात, असा इशारा यात देण्यात आला आहे.
जम्मू व काश्मीरमध्ये, तसेच नेपाळ आणि बांगलादेशलगतच्या सच्छिद्र सीमांवरील सुरक्षाव्यवस्थेतही वाढ करण्यात आली असून, कुठलाही घातपाताचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी कडक गस्त ठेवण्यात आली आहे.
ईशान्येकडील राज्यांमध्ये, विशेषत: काल रात्री कोक्राझार व नागांव जिल्ह्य़ांमध्ये चार आयईडी सापडलेल्या आसाममध्येही सुरक्षा व्यवस्था आवळण्यात आली आहे. कामतापूर लिबरेशन ऑर्गनायझेशनचा एक दहशतवादी कोक्राझार व गुवाहाटीदरम्यानच्या रेल्वेमार्गावर स्फोटके पेरत असताना चकमकीत मारला गेला.